मना सर्वथा सत्य सांडूं नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
मना सत्य तें सत्य वाचे वदावें । मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥ १९ ॥
श्लोकाचा पहिला अर्थ:
जगात चिरकाल टिकणारे आणि कधीही नाश न होणारे एकच सत्य आहे. ते म्हणजे भगवंत. जगाच्या सुरुवाती पासून जे टिकले आहे ते सत्य म्हणजे भगवंत. म्हणून त्याची कास सोडू नये असे समर्थांनी इथे सांगितले आहे. जे नश्वर आहे त्याला समर्थ मिथ्या म्हणतात. आपल्याला ज्याचा आभास होतो ते मिथ्या उदाहरणार्थ: अंधुक प्रकाशामुळे आपल्याला दोरी सापासारखी दिसू लागते आणि त्यामुळे आपण त्याला काठीने मारतो. मग प्रकाश पडला की समजते की तो साप नव्हता आणि साधी दोरी होती. इथे दोरी वाटणे याला मिथ्या किंवा माया म्हणतात. प्रकाश आल्यामुळे आपल्याला खरे समजते ते सत्य. म्हणजे भगवंत हा सत्य आणि भ्रम दूर होणे म्हणजे आत्मज्ञान होणे. आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो. पण आपली कल्पनाच किती संकुचित असते, याचा कोणी विचार करीत नाही. जो कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल? जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे आजमावता येणार? माझ्या बुद्धीच्या पलीकडे काहीतरी आहे ते शोधण्याचा प्रयत्न करावा असे समर्थांना इथे सत्य सांडू नको म्हणून सांगायचे आहे. मात्र आपण जे डोळ्या दिसते, कानाला ऐकू येते आणि स्पर्शाने जाणवते त्याला सत्य मानतो आणि त्याच्या पलीकडे काही आहे हे विसरून जातो. समर्थ म्हणतात इंद्रियांना जे दिसते ते मिथ्या किंवा माया असते सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते, म्हणजे परमात्मस्वरूप होय. समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले, तरी त्याच्याखाली पाणीच असते. म्हणजे लाटेचा फेस मिथ्या आहे आणि पाणी हे सत्य आहे. फेस हात धरायचा प्रयत्न करू नये कारण ते जमणार नाही तसेच जगात विषयात सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर निराशाच पदरी पडेल. कारण विषयसुख हे मिथ्या आहे आणि भगवंत हे सत्य आहे. ब्रह्माचे (सत्या) निरूपण सांगता येण्यासारखे नसते. साखर खाल्ल्याशिवाय तिची गोडी कळत नाही, काही मर्यादेपर्यंत शब्दांनी सांगता येते. खोटयावरून खऱ्याची परीक्षा करता येते, तसे माया ज्याला कळली त्याने ब्रह्म जाणले म्हणून समजावे. पण मी मायारूपच जर झालो तर ती कशी ओळखावी बरे? वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया. तेव्हा मायेच्या तावडीत सापडल्यावर, सत्य आणि परमात्मस्वरूप असणारे ब्रह्म जाणणे कसे शक्य होणार? जी जगतेमरते ती माया. म्हणजे माया ही नासणारी आहे, भंगणारी आहे. याच मायेला समर्थ इथे मिथ्या म्हणतात आणि तिला सोडून द्यायला सांगत आहेत जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया. तिला आपण खरे मानतो. मायेला असत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते. आपण मायेच्या पाठीमागे जातो, पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजते तेव्हा आपण स्वस्थ होतो. तो आहे, तेव्हां त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे. अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे. एक भगवंत सत्य आहे. आपले कुठे चुकत असेल तर ते हेच की, आम्ही प्रपंच सत्य मानतो. भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्त्व नाही.
घरदार सोडायचं नाही, घरादारातली आसक्ती सोडायची आहे. नातीगोती सोडायची नाहीत, त्यांच्यातली आसक्ती सोडायची आहे. पैसा सोडायचा नाही, त्यातली आसक्ती सोडायची आहे. आपण एखादं घर घेतो तेव्हा ते घेण्याआधीच घर कसं असावं, या कल्पनांचा मनातला पसारा त्या प्रत्यक्षातल्या घरापेक्षा फार मोठा असतो. अगदी त्याचप्रमाणे नात्यागोत्यांशी आपला प्रत्यक्ष संबंध मर्यादित असतो. म्हणजेच काळ, वेळ आणि परिस्थिती याच्या मर्यादेत आपण असल्यानं आप्तस्वकीयांशी भेटीचे, व्यवहाराचे संबंध प्रत्यक्षात कमी असतात. तरी प्रत्येक आप्ताबद्दल आपल्या मनातल्या अनुकूल-प्रतिकूल विचारांचा पसारा फार मोठा असतो. त्यानुसारचं त्यांच्यासोबत गुंतणं किंवा त्यांना टाळणंही असतं. अंतरंगातली जगाकडची ही ओढ कमी करीत न्यायची आहे. जगण्यातलं जे असार आहे, बदलणारं म्हणूनच जे मिथ्या आहे, अशाश्वत आहे त्याचंच मनन, चिंतन, विचार, कल्पना आपल्या मनात सातत्यानं सुरू असतात. ती सवय आता बदलायची आहे. त्या असत्याच्या ओढीत सत्याकडे होणारं दुर्लक्ष थांबवायचं आहे. हे कधी होईल? जेव्हा आपल्याच अंतर्मनाकडे आपण लक्ष द्यायला लागू तेव्हा, म्हणजेच भगवंताचे अनुसंधान वाढवले तरच ते शक्य होईल. आणि सत्य आणि मिथ्या यातील फरक समजेल. त्यामुळे आपोआपच आपण मिथ्या वस्तूंवरची आसक्ती कमी करू असे समर्थांना इथे चौथ्या ओवीत (मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें) सांगायचे आहे
श्लोकाचा दुसरा अर्थ
सत्य : कायम खरं बोलावे आणि खऱ्याच्या बाजूने उभे राहावे मिथ्या : १) भ्रष्टाचार करून दुसऱ्याचे धन ओरबाडून घेणे म्हणजे मिथ्या २) खोटी साक्ष घेऊ नये, ३) खोटी स्तुती करून आपले मतलब साध्य करून घेऊ नये ४) विश्वासघात करू नये
