जगीं पाहतां साच तें काय आहे । अती आदरें सत्य शोधूनि पाहें ॥ पुढें पाहतां पाहतां देव जोडे । भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥ या जगात सत्य म्हणून काही आहे का, हा प्रश्न मनात येतो तेव्हा समर्थ सांगतात की अतिशय आदरानं हा प्रश्न मनात जपून ठेव. त्याची हेळसांड करू नकोस. तो प्रश्न विस्मरणात जाऊ देऊ नकोस. कारण मनात प्रश्न उद्भवला तरी तो मनानंच झिडकारला जाण्याची शक्यता असते. जीवनात नेमकं सत्य आहे तरी काय, हा प्रश्न मनात आला तरी मनच सांगतं, सत्य काय ते आपल्याला कधी कळेल तरी का? आपली का ती कुवत आहे? तेव्हा समर्थ सांगतात, या प्रश्नाचा अत्यंत आदरानं स्वीकार करा आणि अत्यंत आदरानं उत्तराचाही शोध घ्या! कारण जोवर ‘कोऽहं’ म्हणजे ‘मी खरा कोण आहे,’ हा प्रश्न मन कुरतडत नाही, तोवर ‘सोऽहं’म्हणजे ‘मी तोच आहे,’ इथपर्यंत पोहोचण्यासाठीचं पहिलं पाऊलही उचललं जात नाही. आपल्याला डोळे मिळाले आहेत. त्यांच्या मदतीने आपण आजूबाजूला असलेल्या गोष्टी पाहतो. कान मिळालेले आहेत, त्यांनी ऐकतो. कधी असं होतं की एखाद्या गोष्टीबद्दल आपण ऐकून असतो त्यापेक्षा ती प्रत्यक्ष बघितल्यानंतर वेगळीच निघते. आणि कधी अ...