।। जय जय रघुवीर समर्थ ।। मना वासना वासुदेवीं वसों दें । मना कामना कामसंगीं नसों दें ॥ मना कल्पना वाउगी ते न कीजे । मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥ समर्थांच्या लेखी राम आणि कृष्ण यांत उपासनेच्या दृष्टीनें भेद नाहीं, हें येथील वासुदेव या कृष्णवाचक शब्दाचा उपयोगावरून सिद्ध होते. समर्थ स्वतः रामोपासक आहेत. पण कृष्णभक्ति करणारा वाया जातो असा सांप्रदायिक दुराग्रह त्यांचे ठिकाणी नाही. त्यामुळे आपण समर्थांचा हा मनाचा श्लोक आपण भगवत गीतेच्या बाराव्या अध्यायाच्या साह्याने समजावून घेऊ या . त्यातील २,६,८, आणि १२ क्रमांकाचे श्लोक खाली उद्धृत केले आहेत मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते । श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ १२-२ ॥ भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन, ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात. ॥ १२-२ ॥ ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः । अनन्येनैव योगेन मां ध्...