|| जय जय रघुवीर समर्थ || गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ समर्थ रामदासानी रचलेले मनाचे श्लोक म्हणजेच मनोबोध खूप सोपे आहेत आणि समजले आहेत असे वाटते . पण खोलात जाऊन विचार केला तर त्या मध्ये संपूर्ण गीता आणि वेदांत भरलेला आहे . सोप्या गोष्टी अवघड करून सांगितले की ती व्यक्ती खूप विद्वान असे लोकांना वाटते परंतु अवघड गोष्ट सोपी करून सांगणे अत्यंत अवघड असते . समर्थ आपल्याला या मनाच्या श्लोकां मध्ये भागवत गीतेसारखा अवघड ग्रंथ सोपा करून सांगत आहेत . भगवत गीता म्हणजे वेद म्हणजे सोन्याची खाण आणि त्याच खाणीतील सोने वापरून समर्थानी आपल्यासाठी एकदम सोपे सुटसुटीत आणि अत्यंत मोहक असे २०५ सोन्याचे दागिने भेट म्हणून दिले आहेत . हल्ली सगळे तात्काळ समजायला हवे असते त्या प्रमाणे हे २ मिनिटात पाठ करण्यासारखे , आणि समजायला सोपे श्लोक तर खूपच उपयोगी आहेत . मनाचे श्लोक म्हणजे प...