मना मानसीं दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी
मना मानसीं दुःख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता
नको रे ॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी ।
विदेहीपणें मुक्ति
भोगीत जावी ॥१२॥
दहाव्या
श्लोका मध्ये समर्थांनी देहाला पडणारे कष्ट किंवा दुःख हे आत्मसुख प्राप्ती साठी हिताचे असल्यामुळे त्या परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन त्यालाच सुख मानावे असा विचार सांगितला आहे. त्यानंतर अकराव्या श्लोकात दुःख का येतात त्याची कारणे दिली आहेत, आतां या बाराव्या
श्लोकांत पुन्हां मागे सांगितलेल्या साधनापेक्षा वरच्या प्रतीचें साधन समर्थ स्पष्ट करीत आहेत. समर्थ अशा दुःखाच्या संदर्भात उपदेश करतात कीं शरीराला वेदना सोसाव्या लागल्या तरी ते दुःख मनात आणू नकोस, हाय हाय करू नकोस, कण्हत
बसू नकोस. इतरांना उच्छाद होईल असे वागू नकोस. कारण दुःख उगाळत बसून ते अजून वाढतच जाते आणि आजू बाजूची लोकं सुद्धा वैतागून आपल्याला टाळतात. आपण कधी कधी सहानुभूती मिळवण्यासाठी
किरकोळ दुःख असेल तरी सगळे घर डोक्यावर घेतो
ते अत्यंत चुकीचे
आहे असं समर्थ
इथे बजवात आहेत. शोक आणि चिंता या दुःखाच्याच पुढच्या वा दुःखामुळे निर्माण होणाऱ्या मनाच्या अवस्था आहेत, त्या तर कधींच उत्पन्न होऊ देऊं नयेत असे समर्थ 'सर्वथा' या शब्दाने सुचवित आहेत. दुःखाला कुरवाळत बसून ते कमी व्हायच्या ऐवजी वाढतच जाते.
मुळ दुःखा पेक्षा आपल्या दुःखामुळे आलेल्या मानसिक स्थिती मुळेच जास्त दुःख होते. कारण दुःखाचे रूपांतर आपण शोकात आणि चिंतेत करून टाकतो. त्या
मुळे दुःखामुळे
आलेली विषण्णता, झालेला वैताग आणि मग त्यातून नैराश्य असे वेगवेगळ्या पायऱ्या आपण चढत जातो. ते करू नये असेच समर्थांना इथे सांगायचे आहे
कुस्त्या खेळून, शरीरबळ वाढते; अवघड उदाहरणे सोडवून बुद्धिबळ वाढते; तसेच, आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे; आणि ते करण्याकरिताच परमेश्वर संकटे धाडतो; अशा परिस्थितीत, संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय. त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते. भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणे आले असता औषध घ्यावे. पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना? औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे? एकाला येतो, एकाला नाही. ज्याचे ज्यात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे. तुम्ही एकच करावे, परमात्म्याला शरण जाऊन, "हा भोग भोगण्याची मला ताकद दे, समाधान भंगू देऊ नकोस, तुझे सतत स्मरण व्हावे." असे मागावे. दुखणे भोगायचे आहे तर ते समाधानाने का नाही भोगू? प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे, कर्ज, तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार? दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी, म्हणजे आपोआप ते कमी होईल. यालाच विवेक बुद्धी म्हणतात. देहाचे चोचले पुरविण्यात आपल्यापकी कोणीही कमी नाही. देहबुद्धी कमी करणे म्हणजे देहाची हेळसांड करावी हा सांगण्याचा हेतू नाही. शरीर सुदृढ असावे ते ईश्वरप्राप्तीचे साधन म्हणून. माझ्या वाटय़ाला या जन्मात आलेले कर्म नीट पार पाडण्यासाठी हा देह नीट ठेवला पाहिजे. देहरक्षण म्हणजे ‘फक्त देहबुद्धीची’ जोपासना नाही. आपल्या मनातील ‘प्रेम’ भावनेचे TUNING स्वत:च्या देहावरून काढून भगवंतांवर केले की देहाला दुःख असले म्हणून काय बिघडले ? भगवंतांवर वृत्ती स्थिर केले की, दुखण्याची जागा आनंदाने घेतलीच म्हणून समजा. यातूनच पुढे हळू हळू देहात असूनही मिळणे असे म्हणतात. मग दुःख असले काय आणि नसले काय याने काहीच फरक पडत नाही. यालाच मुक्ती असे म्हणतात. सुख आणि दुःख या पासून मुक्ती मिळवणे हेच समर्थ या श्लोकात संगत आहेत.
