धुरू लेकरूं बापुडे दैन्यवाणें । कृपा भाकिता दीधली भेटि जेणें ॥ चिरंजीव तारांगणीं प्रेमखाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥ सूर्यवंशामध्ये उत्तानपाद नांवाचा राजा होऊन गेला. ध्रुव हा त्याचा पुत्र. त्याच्या आईचे नांव सुनीति. हा मोठ्या प्रेमाने आपल्या वडिलांच्या मांडीवर बसला असतांना त्याच्या सावत्र आईने, सुरुचीने राजाच्या लाडक्या राणीने, त्याला उत्तानपादाच्या मांडीवरून मत्सराने खालीं ओढले, आणि लाथ मारून हाकलून दिलें. लाडक्या बायकोच्या मुठीत गेलेला बाप कांहीं बोलू शकला नाहीं. ही अगतिकता ध्रुवाला फार बोचली. त्याची आई सुनीति त्याला म्हणाली- बाळ, असा शोक करूं नकोस. भगवंताला आपलासा कर. तो अनाथांचा नाथ आहे. पांच वर्षाचा ध्रुव आईला नमस्कार करून घराबाहेर पडला. महर्षि नारदांच्या उपदेशाप्रमाणे त्यानें श्रीनारायणाची आराधना केली. त्यांच्या निष्ठेने भगवान् प्रसन्न झाले. शामसुंदर चतुर्भुज असा रूपांत त्याच्यापुढे प्रकट झाले. ध्यानासाठी डोळे मिटलेले असतांनाहि परमात्म्याचे आल्हाददायक, शीतल तेज ध्रुवाला जाणवले. ध्याननिमग्न ध्रुवाने चकित होऊन आपले नेत्र उघडले आणि पाहिले तो त्या सगुणर...