जगीं पाहतां साच तें काय आहे ।
अती आदरें सत्य शोधूनि पाहें ॥
पुढें पाहतां पाहतां देव जोडे ।
भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥
या जगात सत्य म्हणून काही आहे का, हा प्रश्न मनात येतो तेव्हा समर्थ सांगतात की अतिशय आदरानं हा प्रश्न मनात जपून ठेव. त्याची हेळसांड करू नकोस. तो प्रश्न विस्मरणात जाऊ देऊ नकोस. कारण मनात प्रश्न उद्भवला तरी तो मनानंच झिडकारला जाण्याची शक्यता असते. जीवनात नेमकं सत्य आहे तरी काय, हा प्रश्न मनात आला तरी मनच सांगतं, सत्य काय ते आपल्याला कधी कळेल तरी का? आपली का ती कुवत आहे? तेव्हा समर्थ सांगतात, या प्रश्नाचा अत्यंत आदरानं स्वीकार करा आणि अत्यंत आदरानं उत्तराचाही शोध घ्या! कारण जोवर ‘कोऽहं’ म्हणजे ‘मी खरा कोण आहे,’ हा प्रश्न मन कुरतडत नाही, तोवर ‘सोऽहं’म्हणजे ‘मी तोच आहे,’ इथपर्यंत पोहोचण्यासाठीचं पहिलं पाऊलही उचललं जात नाही. आपल्याला डोळे मिळाले आहेत. त्यांच्या मदतीने आपण आजूबाजूला असलेल्या गोष्टी पाहतो. कान मिळालेले आहेत, त्यांनी ऐकतो. कधी असं होतं की एखाद्या गोष्टीबद्दल आपण ऐकून असतो त्यापेक्षा ती प्रत्यक्ष बघितल्यानंतर वेगळीच निघते. आणि कधी असंही होतं की एखादी गोष्ट आपण नजरेने बघतो आणि तिच्याविषयी आपला ग्रह बनवतो. आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो. पण आपली कल्पनाच किती संकुचित असते, याचा कोणी विचार करीत नाही. जो कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल ?त्यामुळे पंचेंद्रिय च्या साह्याने सत्य शोधता येणार नाही पण त्याचा प्रयत्न सोडू नको असे समर्थ बजावत आहेत. पण तिच्यातले गुण कोणी जाणकार वर्णन करून सांगतो तेव्हा तिचा आधी न दिसलेला पैलू आपल्या लक्षात येतो. आणि मग आपल्याला जाणवतं की वरकरणी जे दिसतं ते खरं असेलच असं नाही. ज्ञानी लोक म्हणतात, “संसार असार आहे, जग मिथ्या आहे.” आपण त्यावर विचार न करता पोपटपंचीप्रमाणे तेच घोकत जातो. अरे पण हे जर मिथ्या, म्हणजे खोटं, असत्य आहे, तर खरं काय? सत्य काय आहे? याचा विचार करायला हवा ना? त्या सत्याचा शोध घ्यायला हवा. तो शोध घेताना ‘बघू या तरी हे सत्य म्हणजे काय आहे ते? ते सत्यच आहे का?’ अशी शंकेची, संशयाची भावना ठेऊन शोध घ्यायचा नाही, तर समर्थ सांगतात त्याप्रमाणे अती आदरे हा शोध करायला हवा. असा आदरपूर्वक शोध करता करता आपल्याला आत्मज्ञानरूपी परमात्मा प्राप्त होतो.
सत्य हे शांत आणि आनंदमय असले पाहिजे; हेच भगवंताचे मूळ स्वरूप आहे. ही सर्व सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली असून, तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे. अर्थात्, सर्व सृष्टी आनंदमय असूनही ती तशी दिसत नाही; हा भ्रम आहे. डोळ्याच्या आतमध्ये पाहण्याची शक्ति नसेल तर बाह्य डोळा असूनही दिसत नाही; परंतु आंतमध्ये शक्ति असली, तरी ती आहे असे बाह्य डोळ्यांशिवाय कळत नाही. त्याचप्रमाणे, सगुण आणि निर्गुण यांचा संबंध आहे. परमात्मा सच्चिदानंदस्वरूप आहे हे जरी खरे, तरी ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही. आपण भगवंताला सगुणात पाहावे तेव्हाच त्याच्या विभूतीचे आपल्याला आकलन होईल. म्हणूनच समर्थांनी 'निर्गुण ओळखून सगुणात रहावे' असे म्हटले आहे. सत्य हे अखंड टिकणारे आहे म्हणून ते शांत आहे; म्हणून सनातन आहे. ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे; कारण अशांतामध्ये आनंद असणे शक्य नाही. म्हणून सत्य हे परमात्मस्वरूप होय. परमात्मस्वरूपी सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितले पाहिजे. पण व्यावहारिक सत्य मात्र निराळे असते. ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे, म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी भगवंताचे अस्तित्व असले पाहिजे. याचा अर्थ असा की, प्रत्येकामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे. हा गुण म्हणजे जगण्याची हौस होय. सर्वांना शांति मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे. ही शांति परिस्थितीवर अवलंबून नाही. शांति एकपणात आहे, द्वैतात नाही. एकामध्ये ज्याचे मन गुंतले, ज्याने आपले मन भगवंताकडे ठेवले, त्यालाच शांतीचा लाभ होतो; मग त्याची इतर परिस्थिती कशीही असो. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे खास, आणि त्याकरिता त्याच्या नामाचे अनुसंधान हे एकच साधन आहे. या जगात सत्य काय आहे ते अती आदरपूर्वक शोधीत पाहात जा. असेच पाहता पाहता असत्य अशा मायेचे टरफल आपोआप उडून जाईल आणि सत्य म्हणजे शाश्वत देव जोडेल. तो जोडताच भ्रम भ्रांती अज्ञानाचा सारा अंधार कोठल्या कोठे लोपून जाईल.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
