तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले । तया देवरायासी कोण्ही न बोले ॥
जगीं थोरला देव तो चोरालासे । गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ॥ १७९ ॥
समर्थांनी अतिशय कठोर शब्दात आणि एकदम रोखठोकपणे आपल्याला खूप महत्वाचा संदेश या श्लोकातून दिला आहे आणि जागे करायचा प्रयत्न केला आहे. या आधी श्लोकात समर्थ मनाला सज्जन असे म्हणत त्याला आंजारून गोंजारून समजावून सांगायचे. या श्लोकात मात्र त्यांनी एकदम आपला भक्तीचा मूळ उद्देश काय असतो हे सांगून टाकले आहे. या श्लोकापासून पुढे चार श्लोकांमध्ये समर्थ या भगवंत किंवा परमेश्वर किंवा थोरला देवाविषयीचे ज्ञान केवळ सद्गुरूच्या कृपेनेच मिळेल आणि तो सद्गुरू कसा ओळखायचा याबद्दल सांगत आहेत. यापूर्वीही बऱ्याच श्लोकांत त्यांनी संत सज्जन किंवा सद्गुरू आणि त्यांचे मार्गदर्शन याबद्दल सांगितले आहे. इथे ते म्हणतात देव -देवता देवता सगळ्याना सगळ्यांना आवडतात आणि त्यांची सगळे पूजा करतात पण खरा असलेला थोरला देव, देवराया हा या त्रैलोक्याचा निर्माणकर्ता आहे त्याला कोणी ओळखायचा फंदात पडत नाही
हें सर्व आजूबाजूला दिसणारे, भासणारे विश्व ज्याच्यामुळें उत्पन्न होतें, ज्याच्या मुळे सगळे व्यवहार चालतात , त्याच्या मर्जीशिवाय गवताचे पान सुद्धा हालत नाही आणि शेवटीं ज्यांत सगळी सृष्टी लय पावते तें म्हणजे ब्रह्म. त्या थोरल्या देवाचे स्वरूप कोणास कळतहि नाहीं आणि तें कळावें अशी कोणाची इच्छाहि नसते. त्याच्याविषयी कुणाला बोलावयाचेंहि नसतें आणि ऐकावयाचेंहि नसतें. सामान्य लोकांना आणि बहुतेक साधकांना हवा असतो तो नवसाला पावणार, संकटातून सोडविणारा आणि इच्छापूर्ति करणारा असा देव. माणसाला चमत्काराची मनापासून आस असते आणि पुराणकथांमधून देवांच्या कृपेचे चमत्कार वाचून आणि ऐकून त्याला असं मनातून सुप्तपणे वाटत असतं की देवाची कृपा झाली, तर आपल्या जीवनातही चमत्कार घडेल. आता आपल्या जीवनातला चमत्कार म्हणजे सारं काही आपल्याच मनासारखं घडत जाईल. एकदा मना सारखे घडले की आपण सुखी होऊ या सुप्त इच्छेने बहुतेक जण भक्ती करत असतो
सामान्य माणसाच्या बुद्धीला खरा थोरला देव जणू पेलतच नाहीं. भव्यतेचा साक्षात्कार सुखावह होण्यासाठी धैर्य असावें लागतें. 'मी' आणि 'माझे' सोडावयाला लावणारा देव कोणाला आवडणार ? त्या थोरल्या देवाला शोधण्यासाठी संयमाची शिदोरी घेऊन, वैराग्याच्या वाटेने ज्याच्याकडे जावे लागतें, ज्याच्या दर्शनासाठी प्रयत्नाची दीर्घकालीन वाटचाल करावी लागते, ज्याच्या भेटीसाठी सदाचाराचे परिचयपत्र लागतें, अहंकाराचा वासहि ज्याला सोसत नाहीं असा देव कोणास भावणार ? देव गुप्त झालेला नसून आपल्या अहंकारामुळे तो आपल्याला दिसत नाही. तो दिसण्याची, म्हणजे असे येथील चौथी ओळ सुचविते .तो थोरला म्हणजे खरा देव या जगात चोरून राहातो. म्हणजेच स्वत:चा कोणताही बडेजाव न करता राहतो. तो आपल्या मोठेपणाचं ओझं कधीच बाळगत नाही. तो गुरुशिवाय दिसत नाही.
खरा सद्गुरू भेटला आणि त्याच्या कडे शिष्य संपूर्णपणे शरण गेला तरच माणसाची कोती वृत्ती पालटेल आणि खऱ्या देवाची ओळख त्याला पटू शकेल. हें घडण्यासाठीं गुरु आणि शिष्य दोन्ही अधिकारी असावे लागतात. समर्थ इथे सांगत आहेत की थोरला देव आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला तर सद्गुरूकृपा झाल्याशिवाय राहात नाही. अमुक एक साधन करीत जा म्हणून सद्गुरूने सांगितले, आपण ते अट्टाहासाने करू लागलो, पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले, तर भगवंताचे प्रेम येणार कसे ? चारपाच वर्षे खूप कष्ट केले, विषय बाजूला ठेवले, पण अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलो, तर साधनाचा जोर कमी होतो हे विसरून जातो आणि त्या ऐवजी आपली निष्ठा घसरायला लागते. म्हणून थोरल्या देवाला भेट थोरला देव जे काही होणार ते सद्गुरूच्याच इच्छेने, त्याच्याच प्रेरणेने होते, अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे. साधनाचे प्रेम तो भगवंतच देतो, हे आपण विसरून जातो. आपण पूर्वी काही साधन करीत नव्हतो, ते आता करू लागलो, असा साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग ? सद्गुरूच्या पायावर एकदा डोके ठेवले की काहींचे काम होते, यात सद्गुरू पक्षपात करतात असे कसे म्हणता येईल ? आपलेच कुठेतरी चुकत असले पाहिजे याचा विचार करावा. आजवर देवाचे नाव घेणे बरे असे वाटत होते, परंतु घ्यायचे काही जमले नाही; ते आता घेऊ लागलो हे त्याच्या कृपेने घेऊ लागलो हे नाही का समजू ?
थोडक्यात त्रैलोक्याची उत्पत्ती ज्याने केली त्या थोरल्या – मोठ्या देवाबद्दल, परमेश्वराबद्दल कोणी काही बोलत नाही. कारण प्रत्यकाला नवसाला पावणारा देवाचं पाहिजे असतो. हा थोरला देव अदृश्य, लपलेला असतो. आणि सद्गुरूच्या मार्गदर्शनाच्या योगानेच तो दिसू शकतो अन्यथा नाही हेच समर्थांना इथे सांगायचे आहे
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
