सदा सर्वदा देव सन्नीध आहे ।
कृपाळूपणें अल्प धारिष्ट पाहे ॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥
आपल्याला
नेहेमी संकट समयी देवाला दोष द्यायची सवय असते . पण त्याआधी प्रत्येकाने हा
श्लोक वाचावा म्हणजे संकटे का येतात आणि त्याकडे आपण कसे बघावे याचा दृष्टिकोन बदलेल.
भगवंत
आपल्या हृदयातही वास करतो असें या श्लोकात आणि सनातन
हिंदू धर्मात सांगितले आहे. तेव्हां भक्तावर आलेले संकट ईश्वराला आधीं कळावे लागतें आणि तें नाहींसें करण्याकरितां तो
दुरून कुठून तरी धावून येतो असें समजणें हें नक्कीच अज्ञानाचें लक्षण नाही का ? ईश्वर
तर जवळच आहे तर मग संकटे येतांतच कां आणि आली तरी ती लगेच नष्ट होत कशी नाहींत, असा प्रश्न आपल्याला संकट समयी पडणे
पडणे स्वाभाविक आहे . त्यावर समर्थ म्हणतात, परमेश्वर सर्वव्यापक असल्याने तो सदा सर्वदा प्रत्येक माणसाच्या जवळ आहेच आणि तो जें तुम्हाला देतो तें कांहीं तरी विषय सुख सारखे क्षुद्र वा सामान्य नसते.
ज्यांत दुःखाचा लवलेशहि नाहीं असे
आत्मसुख तो
भक्तांना देत असतो आणि असा बहुमोल ठेवा सांभाळण्याची पात्रता
आहे कीं नाहीं हे पाहण्यासाठी देव
साधकाची परीक्षा पाहत असतो. या परीक्षा पाहण्यालाच आपण संकट समजतो आणि म्हणून त्याला आपण कंटाळतो . उनाड विद्यार्थ्याला जसें
परीक्षा हें संकट वाटतें आणि मग त्याचें डोके दुखू लागतें तसेच आपलें होते. परीक्षकाला आपण दुष्ट समजतो, आणि म्हणून आपली भाषा 'उत्तीर्ण (पास) झालो' आणि ' अनुत्तीर्ण (नापास) केलें' अशी असतें. प्रगति केव्हां होते, कशी होते, एखादी विद्या कशी मिळते ? त्यासाठी आपल्याला काहीतरी सिद्ध करून दाखवावे लागते . हें आपण जर नीट लक्षात घेतलें तर कृपाळूपणें अल्पधारिष्ट पाहे
या वचनाची खरा अर्थ समजेल. पोहायला शिकजिणारा शिक्षक आणि लेकराला चालायला शिकविणारी आई यांना कुणी दुष्ट, कठोर अशी विशेषण लावील काय
? पोहोणं शिकवणारे शिक्षक
आपण नको नको म्हणत असतांना पाण्यांत खेचतात, मग आधाराचा हात अचानक न कळत काढून घेतात त्यावेळी नाका-तोडात पाणी जाऊन जीव घाबरा होतो आणि आपण घाबरलो कीं
नाका-तोंडात हटकून पाणी जातें . पण तसे केल्याशिवाय पोहायला
कधीं येत नाहीं. पडल्याशिवाय कोणत्याहि
मुलाला कधींहि चालता आले नाहीं. कित्येक वेळां पडल्यामुळे रडू येईल इतकेंहि लागतें. कांहीं मुले, पडूं या कल्पनेने, आधींच रडतात आणि तरी समोर उभी असलेली शहाणी आई त्या पडण्या-रडण्याची अगदीं उपेक्षा करते, हसत उभी राहते. आतां आईला मुलाचे प्रेम नाहीं असें म्हणणार कां ? म्हणून संकटांमद्धो उपेक्षा
होते असें वाटलें तरी कृपाळू परमेश्वर हिताकरिता तसें करीत असतो हें साधकाने लक्षांत ठेवले पाहिजे. धैर्य, वृति, निष्ठा, या गुणांची परमार्थासाठी नितांत
आवश्यकता आहे आणि या गुणांची कसोटी संकटाविना, प्रतिकूल परिस्थितिविना लागत
नाहीं.
खरे
म्हणजे साधकाने प्रत्येक आपत्ति हा एक नवा धडा आहे असें मानलें पाहिजे. EVERY ADVERSITY IS AN OPPORTUNITY असे
समर्थ सांगत आहेत त्यामुळें
क्वचित् शरीराला थोडे कष्ट होतील पण त्यामुळें मनाची प्रसन्नता आणि बुद्धीची विवेकशक्ति चढतीवाढती राहील आणि तसें राहण्यात फार आनंद आहे. थोडेसे मनाविरुद्ध घडले कीं आपण दुखी होतो , कांहीं सुचत नाहीं, कोठे लक्ष लागत नाहीं, संताप अनावर होतो. हे असें काय कामाचे ? कोणत्याहि परिस्थितींत मन
शांत राहिलें, बुद्धि स्थिर राहिली, तरच बाहेर पडण्याचा मार्ग दिसूहि शकतो व त्या वाटेने जातांहि येते. आत्मसुखाची ENTRANCE EXAM आहे असे
संकट समयी आपल्याला वाटायला हवे. आपले अंतःकरण आत्मसुख घ्यायला पात्र आहे की नाही हे भगवंत बघत असतो. तिजोरी
विश्वासू माणसाच्या हातांत सोपवावयाची असते. चोराच्या नाहीं. महत्त्वाची कामे वेंधळ्या माणसावर सोपविली की कार्यनाश झालाच. शहाणी माणसे तें करीत नाहींत. तीं आधीं परीक्षा पाहतात. परमेश्वर तसेंच करतो. ज्या अंतःकरणामर्धे परमार्थ
साठवायचा आहे त्या अंतःकरणाला अहंकार, काम, क्रोध, मत्सर यांची छिद्रे असतां कामा नयेत. परमार्थ ही वस्तु फार सूक्ष्म आहे. नको त्या विकाराचे बारीकसेंहि छिद्र परमार्थाला साठू देत नाहीं. छिद्रें बुजविण्यासाठी भाडे
तापवावें लागतें, ठोकावे लागतें, त्याला डाग द्यावे लागतात किंवा रोंगणहि भरावे लागतें असं संकट समयी आपण लक्षात ठेवावे म्हणून समर्थांनी हा श्लोक लिहिला आहे .संकटे, आपत्ति, प्रतिकूल परिस्थिति हें तापविणे, ठोके मारणे यासारखे आहे अशी आपण दृढ श्रद्धा ठेवावी, विश्वास ठेवावा. परमेश्वर भक्तवत्सल आहे, कृपाळू आहे, सर्वव्यापक असल्यानें सदा सर्वदा पाठीशी उभाच आहे, अशा निश्चयानें वागावे. आपत्तीमध्यें सहाय्य
लाभले तर ती परमेश्वराची कृपाच
समजावी; नाहीच
लाभले तर ही आपली कठोर परीक्षा घेतली जात आहे, यांत पहिल्या क्रमांकानें उत्तीर्ण
झालें पाहिजे म्हणजे चांगलें पद मिळविण्यासाठी आपण
पात्र ठरूं या निष्ठेने विवेकाने जागाचे, धैर्याने वागावे. योग्य ते प्रयत्न न कंटाळता, न खचता करीत राहावे.
आपण
खरोखरीच हा श्लोक तोंडपाठ करून ठेवावा अशा श्लोक आहे की नाही ?
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

