नव्हे कर्म ना धर्म ना योग काही । नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ॥ म्हणे दास विश्वास नामी धरावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥ आपण शाश्वत समाधान आणि सुख मिळवण्याची आपले "धड" पडे पर्यंत धडपडत असतो . त्यासाठी कष्ट करून प्रापंच उभा करतो, धार्मिक कृत्य करतो आणि तरी सुद्धा प्रापंचिक सुखं भोगताना आणि भोगून संपल्यावर आनंद आणि समाधान मिळत नाही असा राख ठोक प्रश्न विचारून आत्मपरीक्षण करायला लावणारा हा श्लोक आहे १) कर्म : कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन! मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽ स्त्वकर्मणि॥२.४७॥ फळाची आशा धरून कर्म करू नका, असे गीते मध्ये भगवंताने सांगितले आहे. त्यासाठी आपण फळाची आसक्ती न धरता, पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करून ज्यावर आपला अधिकार चालतो ते कर्म जास्तीत जास्त सुंदर, योग्य, विवेकपूर्ण करावे. पण आपण नेमके उलट करतो आणि प्रत्येक कर्म करतांना फळाची अपेक्षा ठेवतो आणि त्यातून जय-पराजय, सुख-दु:ख, लाभ- हानी अशा कुठल्याही परिणामाने दुखी होतो. सुख मिळाले तर माझ्या कर्तृत्त्वामुळे आणि दुःख मिळाले तर देवामुळे अशी समजूत करून घेतल्याने कर्म करून सुद्धा आपल्याला दुः...