।। जय जय रघुवीर समर्थ ।।
मना वासना वासुदेवीं वसों दें ।
मना कामना कामसंगीं नसों दें ॥
मना कल्पना वाउगी ते न कीजे ।
मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥
समर्थांच्या लेखी राम आणि कृष्ण यांत उपासनेच्या दृष्टीनें भेद नाहीं, हें
येथील वासुदेव या कृष्णवाचक शब्दाचा उपयोगावरून सिद्ध होते. समर्थ स्वतः रामोपासक आहेत.
पण कृष्णभक्ति करणारा वाया जातो असा सांप्रदायिक दुराग्रह त्यांचे ठिकाणी नाही. त्यामुळे
आपण समर्थांचा हा मनाचा श्लोक आपण भगवत गीतेच्या बाराव्या अध्यायाच्या साह्याने समजावून
घेऊ या . त्यातील २,६,८, आणि १२ क्रमांकाचे
श्लोक खाली उद्धृत केले आहेत
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते । श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ १२-२ ॥ भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन, ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात. ॥ १२-२ ॥
ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः । अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ १२-६ ॥ परंतु जे मत्परायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुणरूप परमेश्वराचीच अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात ॥ १२-६ ॥
मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय । निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥ १२-८ ॥ माझ्यातच मन ठेव. माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर. म्हणजे मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही. ॥ १२-८ ॥
श्रेयो
हि ज्ञानमभ्यासाञ्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ॥ १२-१२ ॥ मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ
आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही
सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण त्यागाने ताबडतोब परम शांती मिळते.
॥ १२-१२ ॥
समर्थ म्हणतात-मना ! तुझ्या सर्व वासना, सर्व हवें
वाटणें, सगळ्या आशा-आकांक्षा वासुदेवाच्या ठिकाणीं राहूं देत. प्रत्येक कर्म भगवंतासाठी
करणे याचाच अर्थ आपल्या वासना वासुदेवी वासू दे .आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या
सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते. लोक समजतात तितके वासनेला जिंकणे कठीण
नाही. आपली वासना कुठे गुंतते ते पाहावे. आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून, आपल्याला
कोणता रोग झाला आहे हे डॉक्टर पाहातात, त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे हे
आपण पाहावे; तो आपला रोग आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे वेडेपणाचे
आहे, हे ध्यानात ठेवावे. म्हणूनच विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल.
मग आपले कर्तेपण आपोआप मरून जाईल. हिमालयावर ज्या वेळी आकाशातुन बर्फ पडते त्या वेळी
ते अगदी भुसभुशीत असते, पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते. त्याचप्रमाणे,
वासनाही सूक्ष्म आणि लवचिक आहे, पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो. मग
ती काढणे फार कठीण जाते. भगवंताची वासना ही वासना होऊच शकत नाही. ज्याप्रमाणे कणीक
अनेक वेळा चाळून गव्हाचे सत्व काढतात, त्याप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी करावी
आणि आपली वासना वासुदेवाच्या जवळ सदैव ठेवावी. आपल्यासारखा व्यवहारी प्रापंचिक माणसांना भगवंताचे चिंतन करण्यात एकच अडचण येते. ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणे. आपली अशी कल्पना असते की भगवंताचे चिंतन करणारा माणूस व्यवहार करू शकत नाही. तुकारामबुवांसारख्या परमात्मचिंतनात बेभान झालेल्या पुरूषांची गोष्ट निराळी. आपल्यासारख्या माणसांना आपला व्यवहार अत्यंत बरोबर केल्यानंतर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तर आपण फारच प्रगती केली असे म्हणता येईल. खरे पाहिले असता सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा. मनुष्य अगदी एकटा असला किंवा एकांतात असला तरी आपल्या कल्पनेने तो अनेक माणसे आपल्या भोवती गोळा करतो. विशेषत: विद्वान लोकांना कल्पना जास्त असतात. तेव्हा कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करू या. भगवंत हा दाता आहे, त्राता आहे, सुख देणारा आहे, अशी कल्पना आपण करू या; त्यातच खरे हित आहे. कल्पनेच्या पलीकडे असणारा परमात्मा आपण कल्पनेत आणून सगुण करावा, आणि तिथेच आपले चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. हे सगळे साध्य करण्यासाठी संतांच्या ठिकाणी आपले
मन गुंतवणे जरुरी आहे . प्रत्यक्ष संतांच्या देहाचा सहवास मिळणे सगळ्यांना शक्य नाही.
त्यामुळे त्यांनी सांगितलेलं साधन करणे , ग्रंथांचे वाचन करणे आणि नामस्मरण केल्याने
आपले इस्पित साध्य होईलच अशी खात्री इथे समर्थ शेवटच्या ओवीमधून देत आहेत . आपल्या
कल्पना , कामना आणि वासना भगवंता करिता अर्पण करायच्या असतील तर संत संगती आणि नामस्मरणाला
पर्याय नाही. म्हणून समर्थ म्हणतात हे मना, वासुदेवाच्या म्हणजे हरीच्या ठिकाणी सर्व वासना ठेव. कामनांना कामाचा वारा लागू देऊ
नकोस. म्हणजे त्या निष्काम असू देत. हे मना, उगीच विषयासंबंधी कल्पनांची जाळी विणत बसू नकोस. त्याउलट सज्जनांच्या संगतीत रमून जा.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
