नव्हे कर्म ना धर्म ना योग काही ।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ॥
म्हणे दास विश्वास नामी धरावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥
आपण शाश्वत समाधान आणि सुख मिळवण्याची आपले "धड" पडे पर्यंत धडपडत असतो . त्यासाठी कष्ट करून प्रापंच उभा करतो, धार्मिक कृत्य करतो आणि तरी सुद्धा प्रापंचिक सुखं भोगताना आणि भोगून संपल्यावर आनंद आणि समाधान मिळत नाही असा राख ठोक प्रश्न विचारून आत्मपरीक्षण करायला लावणारा हा श्लोक आहे
१) कर्म : कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन! मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽ स्त्वकर्मणि॥२.४७॥ फळाची आशा धरून कर्म करू नका, असे गीते मध्ये भगवंताने सांगितले आहे. त्यासाठी आपण फळाची आसक्ती न धरता, पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करून ज्यावर आपला अधिकार चालतो ते कर्म जास्तीत जास्त सुंदर, योग्य, विवेकपूर्ण करावे. पण आपण नेमके उलट करतो आणि प्रत्येक कर्म करतांना फळाची अपेक्षा ठेवतो आणि त्यातून जय-पराजय, सुख-दु:ख, लाभ- हानी अशा कुठल्याही परिणामाने दुखी होतो. सुख मिळाले तर माझ्या कर्तृत्त्वामुळे आणि दुःख मिळाले तर देवामुळे अशी समजूत करून घेतल्याने कर्म करून सुद्धा आपल्याला दुःखच पदरात पडते. अहंकार न सोडता कर्म केले तर समाधान मिळणार नाही. नव्या इच्छांच्या पूर्तीसाठी आपण कर्म करत राहतो. काही कर्म आपण आपली इच्छा असो वा नसो कर्तव्य रूपानं त्याच्या वाटय़ाला येतात. तीदेखील आपल्याला पार पाडावीच लागतात. त्यामुळे त्यांच्या पूर्तीसाठी कर्म नेमकं कोणतं करावं आणि कसं करावं, हे आपल्याला उमजत नाही. त्यामुळे तो अनेकदा र्कम चुकीची होतात, अव्यवस्थित होतात किंवा त्यातून नवनवी र्कमही वाटय़ाला येतात. सामाजिक कार्य करून समाजाच्या भल्यासाठी संघटित झालेले असे अनंत ‘मी” हे समाजाचं भलं म्हणजे नेमकं काय आणि ते कशात आहे, हे ठरवण्याचा मक्ता घेतात! यामुळे त्यांच्या मधील अहंकार जागाच राहतो आणि समर्पण भाव संपतो आणि जरी कार्य उत्तुंग होत असलं तरी त्यातून शाश्वत सुख मिळत नाही. मी इतकं या संस्थेसाठी कार्य केलं आणि माझी कोणाला फिकीर नाही असा भाव निर्माण होऊन शेवटी निराशाच पदरी पडते आणि मन दुःखी होते.
२) धर्म आणि योग “धार्मिक व्रत वैकल्ये , पूजा, यज्ञ असे अनेक उपाय करून सुद्धा आपल्याला त्यातून समाधान प्राप्त होत नाही कारण ते धार्मिक कार्य करतांना आपला भाव त्यात नसतो. आपण देहाने ते धार्मिक कृत्य करतो पण मनाने आपली भक्ती कमी पडते. धार्मिक कार्य करण्या मागचा उद्देश सुद्धा ऐहिक गोष्ट मिळवणे हाच असतो. त्यामुळे त्यातून सुद्धा सुख आणि समाधान मिळत नाही . लोकांना आपण किती धार्मिक आहोत याचा टेम्भा मिळवण्या करीत सुद्धा आणि देवाची भीती म्हंणून आपण वरवर धर्म पालन केल्या सारखे दाखवतो. तीर्थ-यात्रेला जातांना सुद्धा आपले मन प्रापंचिक गोष्टीत अडकलेले असते . धार्मिक कर्म करतांना आनंद मिळत नाही कारण आपण “स्व” ला विसरून ते कार्य करत नाही. ‘ब्रह्मात विलीन झाले की, शाश्वत सुख मिळते, असे धर्म सांगतो. पण धार्मिक कार्यात अहंकार सोडला नाही तर त्यातून शाश्वत सुख कसे मिळणार ? तेव्हा यज्ञ, पूजा , व्रत आणि यागानंही समाधान लाभण्याची शाश्वती नाही. योग मार्गाने समाधान मिळवण्यासाठी आपली दिनचर्या अनुकूल नसते, प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून योग मार्गात सांगितलेलं यम नियम पाळणे अशक्य होऊन जाते . त्यासाठी अरण्यात जाऊन संन्याशी होणे गरजेचे आहे. तसे गुरु सुद्धा मिळणे दुरापास्त असते .
३) भोग आपण अशाश्वत (किंवा अनित्य) गोष्टींपासून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टी मर्यादित किंवा कायम बदलणाऱ्या असल्यामुळे त्या गोष्टींमध्ये निरंतर टिकणारे सुख नसते. आपल्यातील शाश्वताला (किंवा चिरंतन तत्त्वाला) जाणून न घेताच अशाश्वत गोष्टींपासून कितीही सुख, शांती मिळवण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा उपयोग होत नाही. आपला देह सुद्धा सुख भोगायला साथ देईनासे झाला की त्यातून सुख मिळत नाही , संप्पणी भरपूर मिळाली पण मन दुखी असेल तर सुख भोगणे अशक्य होऊन जाते .
४) त्याग : ‘सर्व भोग उपभोगण्यापेक्षा त्यांचा त्याग महत्त्वाचा आहे, भोगात तात्काळ सुख मिळते, तर त्यागात प्रथम दुःख आणि नंतर आनंद आहे असे वाचून आपण त्याग करायचे म्हंटले तरी मोह आणि मत्सर हे गुण राहिल्यामुळे त्याग करणे जमत नाही आणि त्याग केल्याचा अहंकार वाढीस लागतो तो वेगळाच.
त्यामुळे समर्थ परत एकदा कळकळीने आणि तळमळीने सांगत आहेत नामस्मरण करण्यावाचून पर्याय नाही. त्यात मन एकाग्र होत नाही, न होऊं दे पण नामस्मरण सोडू नये. रोज सकाळी उठल्याबरोबर किमान दहा मिनिटे तरी नित्यनेमानें नाम घ्यावें. दिवसाकाठी मिळेल तो रिकामा वेळ नामस्मरणांत घालवावा. झोपण्यापूर्वी शांतपणे सरळ बसून भगवंताचे नाम घ्यावे, त्यातून मनाची प्रसन्नता वाढते असा अनुभव निश्चित येईल असे छाती ठोकपणे समर्थ सांगत आहेत. लहान मुले रोपाच्या बिया पेरतात आणि उगवले कां म्हणून पुन्हा पुन्हा उकरून पाहतात. तशी अधीरता मात्र नसावी.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
