अहो ज्या नरा रामविश्वास नाही । तया पामरा बाधिजे सर्व काही ॥ महाराज तो स्वामि कैवल्यदाता । वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥ शाळे मध्ये परीक्षेत दोन भिन्न गोष्टी मधील फरक सांगा असा एक नेहेमी प्रश्न असायचा. या श्लोकात समर्थ बद्ध आणि साधक या दोन भिन्न प्रवृत्तीच्या लोकांमधील फरक सांगत आहेत. पहिल्या दोन ओवी बद्ध प्रवृत्तीच्या आहेत आणि तिसरी आणि चौथी साधक प्रवृत्तीबद्दल सांगत आहेत. कसे ते बघू. दारूच्या आहारी गेलेल्या एखादा मनुष्य व्यसन मुक्ती केंद्रात गेल्यावर तिकडे सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टर रुग्णांना दारू पासून होणारे दुष्परिणाम सांगतात. वेगवेगळ्या तऱ्हेने समजावून सांगतात आणि त्यांना त्यातून सोडवण्याचा प्रयत्न करतात. तरी सुद्धा काही रुग्ण ऐकत नाहीत कारण त्यांना आपले हित कशात आहे हेच समजून घ्यायचे नसते. त्याच प्रमाणे संसारात ज्याला आपले नरजन्माचे हित समजत नाही त्या लोकांना उद्देशून हा श्लोक लिहिला आहे. अशा लोकांना समर्थ इथे पामर असे म्हणतात. पामर म्हणजे ज्याची कीव करावी असा. माझ्या मते माणसाला दिलेली ही सगळ्यांत वाईट शिवी आहे. पुरुषाला न...