मना प्रार्थना तूजला एक आहे ।
रघूराज थक्कीत होऊनि पाहे ॥
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३८ ॥
या आधीच्या दहा श्लोकांमध्ये राम आपल्या भक्तांची कशी काळजी करतात, रामचंद्र किती पराक्रमी आहेत आणि आपली सदैव काळजी घेतात हे सुद्धा पटवून दिले. शाश्वत सुख पाहिजे असेल तर रामभक्ती आणि नामस्मरण याला पर्याय नाही हे वेगवेगळ्या प्रकारे सांगून आता समर्थ त्यासाठी उपाय सांगत आहेत . समर्थ भक्तीचे प्रॉडक्ट मार्केटिंग करत असल्यासारखे आपल्याला प्रार्थना करत आहेत की रघुराजाची (भगवंताची) लीला बघून तू थक्कं होऊन जाशील. कारण भगवंताने तयार केलेली प्रत्येक वस्तू कशी नीटनेटकी असते, पाऊस कसा जुलै महिन्यात येतोच येतो, फळं, फुलं, पानं यांचे किती विविध प्रकार असतात असा दृष्टीकोन ठेवून जगाकडे बघितले तर तू थक्क होशील. लहानपणी माझी आजी मला डाळिंबं सोलून देतांना म्हणायची "आहे का तुमच्याकडे असं पॅकिंग? माझा राम बघ कसं एकदम उत्तम पॅकिंग करून डाळिंबाचे दाणे पाठवतो आहे, इतक्या लाखो डाळिंबं असतात एकदा तरी चुकीचे पॅकिंग केलेलं डाळिंबं निघालय का ? जे डाळिंबं खराब होते ते माणसाने नीट हाताळलं नाही किंवा किड्याने खाल्ले म्हणून होते. एकदम थक्क व्हायला होतंय की नाही हे दाण्यांचे पॅकिंग बघून? माझा भगवंत किती ग्रेट आहे" माझी आजी आणि या श्लोकात समर्थांना नेमके तेच सांगत आहेत. जसा एखादा केसरी टूर कंपनीचा माणूस तुम्ही एकदा तरी युरोप आणि अमेरिका बघून याच, एकदम थक्क होऊन बघत जाल असे सांगून तिकिटे बुक करायला भाग पडतो तसे समर्थ या मनाच्या श्लोकात आपल्या मनाला अंजारून आणि गोंजारून प्रार्थना करत आहेत. त्यांना माहिती आहे की बुद्धीला जरी पटले तरी जो पर्यंत मनाला पटत नाही बुद्धीचे काहीही चालणार नाही . म्हणून ते मनाला विनवणी करत आहेत. रघुराज थकीत होऊनि पाहे । ' या ओळीचा निराळ्या प्रकाराने अर्थ केला जातो. तो म्हणजे असा -- अरे मना , तूं परमेश्वराची रामचद्राची-भक्ति इतक्या उत्कटतेने कर, तुझी ओढ इतकी विलक्षण असूं दे कीं भगवंत आश्चर्यानें थक्क होईल. त्याला तुझ्या निष्ठेविषयीं अपरंपार कौतुक वाटेल आणि तो प्रसन्न होईल. निव्वळ भक्तीने तू त्याला प्रिय हो, त्याच्या मनात आपल्यासाठी स्थान निर्माण कर आणि मग त्यामुळे भगवंत आश्चर्यानें थक्क होऊन तुझ्याकडे बघेल. पुढे परत तिसऱ्या ओवीत ते परत सांगतात एकदा मनावर घेतले की त्याची अवज्ञा बिलकुल करो नकोस. कारण मनाचा जा मोठा गन धर्म आहे की मनाची भक्ती मार्गाची गाडी घसरून विषय सुखाच्या मार्गावर जायला वेळ लागत नाही . म्हणून ते परत बजावतात की एकदा राघवाची भक्ती सुरु केली की त्याबद्दल इतर नास्तिक लोकांनी काहीही सांगितले तरी रामा विषयी अनादर आणि भक्ती मार्गाचा , तिरस्कार करू नकोस. आळस किंवा कंटाळा, आल्यामुळे थातुरमातुर भक्ती किंवा नामस्मरण "उरकून" टाकू नकोस. त्या सर्व शक्ति पणाला लावून आणि मनापासून भक्त्ती कर.
लहानपणी आपल्या घरातील कुटुंबप्रमुख सांगतील तसे आपण वागायचो किंवा वागावे लागायचे . कुटुंबप्रमुख काही ठिकाणी आजोबा, काही ठिकाणी मोठे काका किंवा वडील असायचे. त्यांनी ठरवलेले काही नियम घरातील सगळे पाळायचे , उदा घरात संध्याकाळी पर्वाचा म्हणायचा , बाहेर खेळायला गेलो तरी रात्री आठ वाजायच्या आत घरी यायचे, जेवतांना पानात पडेल ते खायचे , नवीन वस्तू कोणती, कधी आणि किती किमतीची आणायची हे ठरवणारा अंतिम अधिकार त्यांच्या कडे असायचा. घरात काही भांडण वगैरे झाले तर त्यांना तो सोडवण्याचा सगळ्यांनी हक्क दिलेला असायचा. त्यांच्या आज्ञेच्या बाहेर कधीही वागायचे नाहीत. ते सुद्धा सगळ्यांना समान वागणूक देऊन सगळ्यांचे लाड करायचे आणि कोणाला काय पाहिजे हे ओळखून सगळ्यांना खुश ठेवायचे. अशा कुटुंबप्रमुखा कडे आपले काही मागणे किंवा गाऱ्हाणे सांगितले की आपण लहानपणी स्वस्थ झोपून जायचो कारण आपल्याला दृढ विश्वास असायचा की बाबा किंवा आजोबा आपलं ऐकतील किंवा आपल्याला समजावून सांगतील की तुझे मागणी कशी चुकीचे आहे . थोडक्यात वस्तू मिळाली तर आनंदचं आणि त्यांनी वस्तू दिली नाही तरी ते आपल्यला हिताचेच करत आहेत हा विश्वास मनात होता. कारण ते चुकणार नाहीत अशी आपली श्रद्धा होती. असे बरेच प्रसंग आपल्याला आठवत असतील की आपण आनंदाने वस्तू नाही मिळाली तरी आनंदीच असायचो आता मोठेपणी आपण स्वतः कुटुंब प्रमुख झाल्यावर काय होते ते बघू . आपण सगळे निर्णय आपण घेतो आणि त्याचे ओझे कायम मनावर घेत असतो. डोक्यात कायम निर्णय बरोबर आहे न, असे केले तर चुकीचं तर होणार नाही ना असे अनेक प्रश्न आपल्याला भंडावून सोडतात . त्या साठी समर्थांनी पुढील पाच (३८ तो ४२) श्लोकातून "राघवी वस्ती कीजे " असे सांगितले आहे . त्याचा अर्थ असा की आपण ज्या घरात राहतो ते आपले घर नसून ते घर रामाचे आहे असे मनाला बजावणे. आपण आपल्या घरात लहान मुलं जसे सगळे घरातील कुटुंब प्रमुखाला सांगतात तश्या सगळ्या गोष्टी रामाला सांगाव्या . चांगली किंवा वाईट गोष्ट घडली की रामाला सांगावी कारण आपण त्याचा घरात राहतो आहे . तो राम आपल्या घराचा कुटुंब प्रमुख आहे . घर सुद्धा आपले नाही आणि कुटुंब प्रमुख पण आपण नाही. सगळी जबाबदारी रामाची. रामाला सगळ्या गोष्टी सांगितल्या की आपले काम झाले . तो म्हणाला असे कर तर आपण तसे करू. काही गोष्ट मना सारखी घडली नाही तर रामाची इचछा कारण त्याच्याच घरात आपण राहतो आहे, आपली जबादारी आहे कुठे ? आपण मात्र रामाला आवडेल असे वागायचे आणि सगळ्या गोष्टी त्याला सांगून करायच्या . गोंदवलेकर महाराजांचे शिष्य तात्यासाहेब केतकर यांनीं तसे वागून दाखवले. ते घरात मिळालेला पगार सुद्धा त्यांच्या फोटो समोर ठेवायचे , त्यांना सांगून खर्च करायचे, पगार वाढ झाली नाही , पैसे कमी पडले तरी त्यांना दुःख होत नसे कारण ते म्हणायचे घर महाराज चालवतात तर मी कशाला काळजी करू.? तसे आपण केले की सगळं स्ट्रेस गायब होणारच एका मिनिटात. हेच समर्थांना इथे सांगायचे आहे आपण रामाच्या घरात राहायला जावे आणि त्याच्या इचछेनुसार वागावे. रामाला आवडेल असे वागावे. आता रामाला काय आवडते ? त्याला भक्ती आणि नामस्मरण या दोन गोष्टी आवडतात . तेवढे केले की बस . कर्तव्य करण्यात आपण कसूर करू नये , मन पासून सगळी कर्तव्य करावी पण त्याचे फळ मिळाले तर उत्तम आणि नाही मिळाले तर रामाची इचछा असे म्हणून आनंदाने स्ट्रेस फ्री जीवन जगावे यालाच शरणागती असे म्हणतात. लहानपणी जसे तसे बाबाना किंवा आजोबांना सांगितले की आपण स्ट्रेस घ्यायचो का ? नाही ना ? मग आत्ता कशाला काळजी करतो ? अजून एक उदाहरण म्हणजे ऑफिस मध्ये एखादे काम येत नसेल किंवा ते करायला कोणाची मदत लागत असेल तर आपण आपल्या बॉस ला जाऊन लगेच सांगतो. आता त्याला सांगितले की आपली जबाबदारी संपली . तो आपल्याला मदत करेल आणि आपला प्रश्न सोडवून देणार याची खात्री असते. जे ऑफिस मध्ये करतो, जे आपण लहानपणी करायचो तेच आत्ता घरात सुद्धा करायचे की काम फत्ते .
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
