महासंकटी सोडिले देव जेणे । प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३१ ॥
सरळ
अर्थ: रामाने बळाचा वापर करून आणि अतिशय पराक्रमाने
युद्ध करून देवांना घोर संकटातून सोडविले, त्याच रामाचे स्मरण प्रत्यक्ष शिव आणि पार्वती
देखील करतात . हा असा आगळा आणि सर्व गन संपन्न श्रीराम आपल्या दासाबद्दल अभिमान बाळग
तो आणि त्याची उपेक्षा कधीही करत नाही
विश्वामित्र
ऋषीच्या विनंतीवरून दशरथ राजाने रामाला आज्ञा केली की ऋषीमुनींच्या तपात विघ्न आणणाऱ्या
राक्षसांचा नाश करावा. त्याप्रमाणे राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांच्या बरोबर गेले आणि
त्यांनी ताटका या राक्षसप्रवृती अंगिकारलेल्या दुष्ट यक्षिणीचा वध केला, मारीच, सुबाहु
इत्यादींचा बंदोबस्त करून तपोभूमी निर्विघ्न केल्या, राम-रावण युद्धानंतर रावणाने कैदेत
टाकलेल्या कित्येक देवांची सुटका केली. अशा या महाप्रतापी रामाच्या आगळ्यावेगळ्या गुणांची
जाण प्रत्यक्ष त्रिशुलधारी शिव आणि हिमालयकन्या पार्वती या दोघांनीही ठेवली असून ते
दोघेही रामाचे म्हणजे तो ज्याचा अवतार आहे त्या विष्णूचे नित्य स्मरण करतात. रामाच्या
आगळ्यावेगळ्या गुणांमध्ये आपल्या सेवकाचा, भक्ताचा सार्थ अभिमान बाळगण्याचा गुणही आहे
आणि त्यामुळेच तो आपल्या सच्च्या भक्ताची, दासाची उपेक्षा कधी करत नाही.
बिभीषण
रामाला शरण आला, तेव्हा त्याला मारून टाकावा असेच बाकीच्यांनी सांगितले. तरी पण रामाने
सांगितले की, "जो मला शरण आला त्याचे रक्षण करणे माझे काम आहे." शरणागताला
नुसते जीवदान देऊन तो राहिला नाही, तर त्याला लंकेचे राज्य दिले. म्हणून सांगतो की,
जो त्याचा होऊन राहतो, त्याची लाज रामाला असते.
साक्षात
शंकर आणि पार्वतींचे उदाहरण या श्लोकात दिले आहे त्या वरून आपण भगवंतचे अनुसंधान करण्यासाठी
प्रववृत्त होऊ आणि अधिक जोमाने आणि दृढ निश्चयाने नामस्मरण करू हाच समर्थांचा उद्देश
आहे
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
