|| जय जय रघुवीर समर्थ
||
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥
समर्थ रामदासानी रचलेले मनाचे श्लोक म्हणजेच मनोबोध खूप सोपे आहेत आणि समजले आहेत असे वाटते. पण खोलात जाऊन विचार केला तर त्या मध्ये संपूर्ण गीता आणि वेदांत भरलेला आहे. सोप्या गोष्टी अवघड करून सांगितले की ती व्यक्ती खूप विद्वान असे लोकांना वाटते परंतु अवघड गोष्ट सोपी करून सांगणे अत्यंत अवघड असते. समर्थ आपल्याला या मनाच्या श्लोकां मध्ये भागवत गीतेसारखा अवघड ग्रंथ सोपा करून सांगत आहेत. भगवत गीता म्हणजे वेद म्हणजे सोन्याची खाण आणि त्याच खाणीतील सोने वापरून समर्थानी आपल्यासाठी एकदम सोपे सुटसुटीत आणि अत्यंत मोहक असे २०५ सोन्याचे दागिने भेट म्हणून दिले आहेत. हल्ली सगळे तात्काळ समजायला हवे असते त्या प्रमाणे हे २ मिनिटात पाठ करण्यासारखे, आणि समजायला सोपे श्लोक तर खूपच उपयोगी आहेत. मनाचे श्लोक म्हणजे प्रत्येक मनुष्यसाठी DOs and DONT आहेत. आपण जास्त खोलात न शिरता blindly follow केले की आपले कल्याण ठरलेलच आहे. या श्लोकांमध्ये वापरलेल्या भाषेत एक प्रकारचे उसळते चैतन्य आहे, आवेश आहे, साक्षात्काराचें तेज आहे, जनहिताची तळमळ आहे, सर्वप्रकारच्या मार्गदर्शनाचा नेमकेपणा आहे आणि त्यामुळे हे श्लोक अतिशय मनोवेधक आणि प्रभावी झाले आहेत. हिला श्लोक बघू.
कोणत्याही नवीन उपक्रमाची सुरुवात गणपतीची आराधना करून आपण सुरु करतो. नवीन वहीची सुरुवात सुद्धा "श्री गणेशाय नमः " असे लिहून करायचो. सर्वात पहिली आरती सुद्धा "सुख करता दुख हरता " हीच गणपतीची आरती आपण शिकलो. लहानपणी मला पहिला श्लोक सुद्धा हाच शिकवला गेला. आता इतक्या वर्षांनी त्याच श्लोकांचा अर्थ लिहिण्याची बुद्धी समर्थांनी द्यावी. गणेशाचे एका शब्दात बोली भाषेत वर्णन करायचे झाले तर -ALL IN ONE GOD. बुद्धिमत्ता, बहुश्रुतता, सूक्ष्मदृष्टि, उद्यमशीलता, क्षमाशीलता, दृढता, शौर्य, धैर्य, कर्तृत्व, सामर्थ्य, लोकसंग्रह, नि: स्वार्थता इत्यादि इत्यादि अनेक गुण व सद्गुण ज्यात आहेत तो म्हणजे गणेश. आपण अशा देवाची प्रार्थना का करत आहोत ते समर्थांनी पुढच्या ओवीत लिहिले आहे "आरंभ तो निर्गुणाचा" म्हणजे ज्या निर्गुण निराकार भगवंता कडे जायचे आहे त्याचा आरंभ गणेशा पासूनच होतो. म्हणजे याला वंदन केले आणि त्याचे आशीर्वाद घेतले की आपल्याला २०५ श्लोक समजायला आणि उमजायला सोपे जाईल. पण नुसते गणेशाची आराधना करून उपयोग नाही त्या बरोबर देवी शारदे चे आशीर्वाद आपल्याला लागणार आहेत. चत्वार याचा अर्थ चार वाणी ज्या पुढील प्रमाणे – परा (आतला आवाज) पश्यंति (भाव निर्माण होणे पण शब्द तयार नाही झाले), मध्यमा (शब्द आणि विचार मनात निर्माण होणे), वैखरी (जिभेने बोलणे). या चारी वाणीचे मूलस्थान शरदा आहे तिला येथे वंदन केले आहे. शारदा वेदांची माता अर्थात जिच्यापासून वेद प्रकटले ती ब्रह्मदेवाची कन्या आहे, तिचे आशीर्वाद असल्या शिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होणारच नाही.
हे सगळे नमस्कार कशासाठी करायचे? अध्यात्मिक मार्गावरील प्रवास निर्विघ्नपणे पार पडावे यासाठीं हा आशीर्वाद घ्यायचा. हा प्रवास कोणता? तर राघवाच्या भक्तीने आत्मज्ञान घेण्याचा प्रवास सर्व मनाचे श्लोक माणसाला या मार्गाच्या प्रवासासाठी प्रवृत्त करण्याकरितां रचले आहेत. राघव कारण, समर्थ रामाचे भक्त आहेत. इतर काही संत कृष्ण उपासना करून आत्मज्ञान करण्यासाठी सांगतील तर काही दत्त उपासनेचा मार्ग पत्करतील. शेवटचे ध्येय एकच. आत्मज्ञान होणे आता आत्मज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान म्हणजे माझे जन्माला येण्याचे प्रयोजन काय? मी कोण आहे? मी कशाने समाधानी होईल? या तीन प्रश्नांची उत्तरे मिळणे आणि ते अनुभवणे म्हणजे आत्मज्ञान.
म्हणजे या श्लोक मध्ये वंदन का करायचे, कुणाचे करायचे, कशा साठी करायचे आणि कुठे जाण्या करिता करायचे हे सगळे फक्त १९ शब्दात त्यांनी सांगून टाकले आहे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
मना सज्जना भक्तिपंथेची जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥
सकाळची प्रसन्न वेळ, सडारांगोळीने शृंगारलेले अंगण आणि त्या अंगणातील तुळशीच्या पवित्र वृंदावनाजवळ उभे राहून समर्थांसारखा तेजःपुंज, वैराग्यसंपन्न, योगीराज, मेघासारख्या करुणागंभीर ध्वनीने या मनाच्या श्लोकांची साद घालीत असेल त्यावेळी क्वचितच एखादे घर असेल जिथे भिक्षा मिळत नसेल. काय भाग्यवान असतील ती लोकं ज्यांच्या घरी समर्थ स्वतः जाऊन श्लोक म्हणत असतील आणि त्यांना भिक्षा घालण्याचे किती पुण्य मिळाले असेल. माझे पूर्वज किंवा मीच मागच्या च्या मागच्या जन्मी नक्कीच त्या भाग्यवानांमध्ये असेल कारण त्या पुण्याई मुळेच मला मनाच्या श्लोकांनी मला अक्षरशः वेडं केलं आहे. शिवाय दासनवमी २०२० च्या उत्सवा च्या काळात समर्थांनी योगेश बुआ रामदासी आणि रेणुकादास रामदासी यांच्या मार्फत पोस्टाने घरपोच पाठवला आणि मकरंद बुआ रामदासी यांच्याशी इंटरनेट वरून ओळख घडून आली.
रामदास स्वामींचे सगळे मनाचे श्लोक भुजंगप्रयात वृत्तांत आहेत. या वृत्तांत प्रत्येक ओळीत १२ अक्षरे व ४ य गण असतात. ३ अक्षरांच्या गटांचा एकेक गण होतो. गणामध्ये पहिले अक्षर ह्रस्व व दुसरी दोन दीर्घ अशी रचना असते. या रचना विशेषामुळे भुजंगप्रयातातील काव्याला एक आकर्षक खटका, ठेका, ताल प्राप्त होतो आणि त्यामुळे या वृत्ताच्या माध्यमांतून सांगितलेल्या उपदेशाला एक प्रकारचा प्रभावीपणाहि येतो. समर्थ जनसंपर्कासाठी घरोघर हिंडून भिक्षा मागत असत. घराघरांशी संबंध यावा आणि जागृतीचे कार्य प्रत्येक ठिकाणी पोचावें या दृष्टीने ही भिक्षेची पद्धत फार सरस ठरली असली पाहिजे. सध्याच्या मार्केटिंग च्या भाषेत याला "कोल्ड कॉल " असे म्हणायचे. असो. आता मूळ श्लोकाकडे वळू या.
एकदा मनावर कोणतीही गोष्ट किंवा नियम घेतली कि माणूस कितीही अवघड आणि काहीही साध्या करू शकतो त्यामुळे या श्लोकात समर्थांनी मनाला वळण लावायचा प्रयत्न केला आहे. मनाला अंजारून आणि गोंजारून सज्जना असे संबोधन करून समर्थ त्याला सांगत आहेत की कायमचे समाधान पाहिजे असेल तर ते भगवंता च्या चरणापाशी मिळेल. भगवंता कडे जायला अनेक मार्ग आहेत ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग. त्यासाठी भक्ती मार्गा इतका सोपा आणि सहज साध्य उपाय नाही. म्हणून इथे ते "भक्तीपंथेची" असा "च" चा वापर करत आहेत. बाकीच्या मार्गाने जाण्याच्या भानगडीत पडू नये आणि भक्ती मार्गानेच जावे असे समसर्थ सांगत आहेत. पण भगवंताला शरण जाणे, त्याला आवडेल ते करणे, त्याला आवडेल तसे वागणे अशी काही पथ्ये पाळली तर समाधान हमखास लाभेल. नवविधा भक्ती म्हणजे नऊ प्रकारच्या भक्ती आहेत त्यातली पहिली आणि शेवटची भक्ती ही अनिर्वाय आहे आणि इतर सात पैकी आपल्याला पाहिजे ती घेऊ शकतो. श्रवण, कीर्तन, पादसेवन, नामस्मरण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आंणि आत्मनिवेदन या नऊ भक्ती आहेत. श्रवण भक्ती पासून सुरुवात करायची आणि शेवटी आत्मज्ञान प्राप्त करायचे, मधल्या सात भक्ती म्हणजे एक प्रकारचे वाहन आहे, यापैकी आपल्या गुरूने सांगितलेल्या "भक्तीवाहनात" बसून आपण प्रवास सुरु करायचा. पण नुसत्या भक्ती मार्गावर प्रयाण करून आपण समाधानी होणार नाही. त्याच बरोबर काही पथ्ये पण पाळायला हवीत. वैद्याने दिलेले औषध घेतले आणि त्याने सांगितलेली पथ्ये पाळली नाहीत तर त्या औषधाचा गुण येणार नाही. तसे आपल्या सज्जनांनी (सद्गुरु) आवडेल तसे वागणे आणि त्यांनी सांगितलेल्या निषिद्ध गोष्टी न करणे हे तितकेच महत्वाचे आहे. सदाचाराने, नीतीने वागणे आणि दुष्ट बुद्धीने वाईट मार्गाने संपत्ती न मिळवणे अशी काही पथ्ये पाळणे अनिवार्य आहे. "लोक काय म्हणतील असे वाटल्यामुळे" असे वागणे म्हणजे "जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।जनीं वंद्य ते सर्व भावे करावे" असे नाही.
त्यासाठी आतून आणि मनापासून सदाचाराने वागणे महत्वाचे आहे. संतांच्या शिकवणी नुसार वर्तन करावे आणि भक्ती मार्गावर चालावे हाच संदेश समर्थांना इथे द्यायचा आहे.
|| जय जय रघुवीर समर्थ
||
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढे वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥
वरवर दिसावयास अगदी व्यावहारिक आणि तांत्रिक उपाय समर्थ या श्लोकात सांगत आहेत. तसें म्हटले तर कोणालाहि सहज साध्य, आचरणांत आणण्यास सोपे पण निष्ठेने केले तर आपण अधिकाधिक भगवंताच्या निकट जाण्यासाठी अत्यंत उपयोगी असे हे उपाय आहेत. कोणते ते आता बघू. सूर्योदयापूर्वीच्या २-३ तास म्हणजे प्रभातकाळ,
सामान्यतः ४॥ पासून ६-६॥ पर्यंतचा काळ प्रभातकाळ म्हणता येईल. त्यावेळेस उठून सकाळी काही काळ रामाचे स्मरण केले तर दिवसभर आपल्याला स्मरण राहायला मदत होते. हें नामस्मरण वैखरी ने (उच्चरून किंवा ओठ आणि जीभ हलवत) करण्यासाठी समर्थ आपल्याला सांगत आहेत. वैखरीने नाम घेतल्याने विसरायला होत नाही म्हणून समर्थ वैखरीने घेण्यासाठी सांगत आहेत. वैखरीच्या वाणीच्या आधीं मध्यमा (गळ्यातून), पश्यन्ति (ह्दयातून) आणि परा (बेंबी पासून) अशा वाणी शास्त्रकारांनी सांगितलेल्या आहेत त्या द्वारे नामस्मरण केले तरी हरकत नाही. परा वाणीने नामस्मरण करणे अत्यंत अवघड असते ते फक्त संत आणि सिद्दपूरुष यांनाच जमते. म्हणूनच समर्थ सुरुवातीला वैखरीने नाम घ्यावे असे सांगत आहेत. आता याचा अर्थ असा नाही की एकदा सकाळी नाम घेतल्यावर आपला आणि नामाचा संबंध संपला. प्रत्येक नवीन गोष्ट सुरु करणे म्हणजे त्या कार्याची "प्रभात" असे म्हणता येईल. त्यानुसार प्रत्येक कृतीच्या सुरुवातीला रामाचे स्मरण करीत राहावे. आपल्या अल्पबुद्धिला असे वाटते नामस्मरणांत घालविलेली १०-१५ मिनिटें काही उपयोग होणार आहे का? उगीचच असे नाम घेऊन त्याचा काय उपयोग? असे श्री राम जय राम म्हणून काय देव भेटणार आहे का? अशी शंका मनात येणार. पण ज्ञानेश्वर,
तुकाराम,
रामदास,
गोंदवलेकर महाराज यांच्यासारखे थोर थोर महात्मे, विचारवंत पुरुष सांगतात त्या अर्थी काहीतरी त्याचा फायदा असणार अशी धारणा ठेवावी. यासाठी आपले कर्तव्य करून उरलेला वेळ आणि काम करत असतांना सुद्धा नामस्मरण केले तर नुकसान काहीच होणार नाही, झाला तर लाभच होईल
पहिल्या दोन ओळींत नामस्मरण करावे असे सांगितल्यानंतर पुढच्या तिसर्या ओळींत समर्थ सद्वर्तनी असावे, सदाचाराचा त्याग करू नये असे सांगत आहेत. सदाचार हाच थोर आहे. म्हणजे श्रेष्ठ, वंदनीय, आदरणीय कार्य आहे. तो आचरणांत आणलाच पाहिजे. त्याचा त्याग होता कामा नये. आता हा सदाचार म्हणजे तरी काय? संतांना आवडेल असे वागणे म्हणजे सदाचार. प्रत्येक कृती करण्या आधी भगवंताला हे वागणे आवडेल का असा विचार करून आपण वागावे. इतका तारतम्य भाव आपल्यात मुळात असतो. समोर भगवंत असेल तर आपण असे बोलू का, असे वागू का, असा विचार करू का असे आपण मनात आणले आणि वागले म्हणजेच सदाचार. पुढे अनेक श्लोकात सदाचार म्हणजे काय हे वेळो वेळी अत्यंत विस्तृत स्वरूपात सांगितले आहे. त्यातील काही श्लोक इथे उल्लेख केले आहेत
1)
धर्माने वागावे असे समर्थ श्लोक क्रमांक ४ मध्ये सांगत आहेत. मना धर्मता नीति सोडू नको हो । मना अंतरी सार विचार राहो 2) धैर्याने वागावे आणि घाबरून जाऊ नये असावे असे सातव्या श्लोकात समर्थ म्हणतात, ’मना श्रेष्ठ धारिष्ठ्य जीवीं धरावे’ 3) सत्य बोलावे. सत्य बोलणे हा सदाचारातला महत्वाचा गुण. ‘सत्यमेव जयते’ हे वचन माहिती आहेच. तेच समर्थ मना सर्वथा सत्य सांडू नको रे असे पाचव्या श्लोकात लिहितात 4) आर्जवी स्वरात आणि गोड शब्दात बोलावे यावर समर्थांनी पुढे – ‘सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकी असे ५३व्या श्लोकात लिहिले आहे 5) सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥ सत्यवादी आणि विवेकाने वागणे म्हणजे सदाचार असे समर्थ पुढे ५३ व्या श्लोकात 6) मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी असे समर्थ ५१ व्या श्लोकात लिहितात कारण द्वेष आणि मत्सर मनात असेल तर मनुष्य कोणत्याही थराला जातो आणि त्याच्या हातून नको ते कोणतेही कृत्य घडू शकते
असे बरेच उपदेश दासबोधात सुद्धा समर्थानी वेळोवेळी केले आहेत. असे वागल्याने माणसाचे आयुष्य धन्य होते. मनुष्य जन्माचा मूळ उद्देश भगवंताची ओळख आहे आणि तो उद्देश साधला की मनुष्य जन्म धन्य झाला आणि सार्थकी लागला. ऐहिक गोष्टी मिळवून जो मनुष्य खूप यशस्वी झाला त्याचे आयुष्य सार्थकी लागले आणि तो धन्य झाला असा सर्व सामान्य समज आहे तो इथे समर्थांना अभिप्रेत नाही.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
मना वासना दुष्ट कामा न ये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडू नको हो । मना अंतरी सार विचार राहो ॥ ४ ॥
आपण बागेमध्ये फिरत आहोत आणि आपली नजर एका सुंदर फुलावर पडते. त्या फुलाला पाहताक्षणीच आपला चेहरा एकदम खुलतो, टवटवीत होतो, अगदी त्या फुलासारखा!
कारण त्या फुलाला पाहताक्षणीच आपल्या मनात विचार आला की, खरंच हे फूल किती सुंदर आहे. त्याचा रंग व सुगंधदेखील आपल्याला मोहून टाकतो. त्या मुळे मन प्रसन्न होते आणि बागेतली फुल बघत काही वेळ आनंदात जातो, जसा सुंदर गोष्टी बघून वेळ आनंदात जातो तसाच एखादा अपघात बघितला तर त्याचे विचार मनात कित्येक तास राहतात, दिवस भर तो अपघात डोळ्यासमोरून जात नाही. थोडक्यात मनातले विचार समोर असलेल्या दृश्य बदलले तरीसुद्धा मनात राहतात आणि त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर होतो. याच उलटत सुद्धा होते, मनात विचार आले की त्या प्रमाणे कृती होत जाते. म्हणून समर्थ इथे म्हणतात काम वासना किंवा वाईट कृत्य करावी असे मनात येऊ देऊ नको. कारण विचार आले की तशा भावना जागृत होतात आणि त्या रेंगाळत राहतात, त्यातून आपला स्वभाव आणि वृत्ती बदलते, मग हातून कृती (कर्म) तसे घडते आणि त्याच स्मृती कायम राहतात. म्हणजे वाईट वासना आणि पाप बुद्धी मनात आणलीच नाही तर पुढील भावना-स्वभाव-कर्म-स्मृती ही साखळी सुरूच होत नाही. श्रीगोंदवलेकर महाराजही सांगतात, ‘‘वासना ही लाडावलेल्या कुत्र्यासारखी आहे. तिला नुसते हड् हड् करून ती बाजूला जात नाही. तेही बरोबर आहे, कारण आपणच तिला लाडावून ठेवली आहे. म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ती देवघरात येते. बरे चांगली वासना तेवढी आत येऊ द्यावी असे म्हणावे, तर तिच्याबरोबर वाईट वासना पण हळूंच आत येते. शिवाय, वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे; कारण आपण स्वत: वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत!’, एखादा मनुष्य काळा असेल तर त्याला आपले काळेपण काही घालवता येत नाही; त्याप्रमाणे,
वासना असणे हा मनुष्याचा एक सहजगुण आहे, तो त्याला पालटता येत नाही. तर मग आम्हाला वासनेतून कधीच मुक्त होता येणार नाही का? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणिमात्रापेक्षा जर काही वेगळे असेल तर चांगले काय आणि वाईट काय हे कळण्याची बुद्धी". त्यामुळे वाईट वासना आणि पाप बुद्धी मनात येऊच ना देणे अत्यंत महत्वाचे. तेव्हा शांतपणे आपल्याला मनात कोणते विचार ठेवायचे याचा अभ्यास करावा आणि प्रयत्नपूर्वक सकारात्मक आणि भगवंताचे विचार मनात आणावे म्हणजे पापी आणि वाईट वासना शिरायला जागाच मिळणार नाही. त्याचा प्रारंभ आपण आपले विचार स्वत: बदलू शकतो. त्यातूनच आपला आत्मविश्वासदेखील वाढू लागतो. म्हणून समर्थ म्हणतात मना वासना दुष्ट कामा न ये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
कर्णाला आपण कुंतीपुत्र आहोत हे कळण्याचा काही मार्ग नव्हता. (कृष्ण वा कुंती यांनी सांगेपर्यंत).
त्याने कौरवदरबारात आपली धनुर्विद्या प्रगट केली तेव्हा लगेचच दुर्योधनाने त्याला आयुष्यभरासाठी जवळ केले. सर्व मानसन्मान व वैभव त्याला प्राप्त झाले होते. त्यापुढील त्याचे आयुष्य सुखाने जाण्यास काही हरकत नव्हती. पण दुर्योधनाची मैत्री त्याला तशी महागच पडली म्हणावे लागते कारण नंतर आयुष्यभर दुर्योधनाच्या सर्व कुटिल बेतांमध्ये त्याला सामील व्हावे लागले. त्याने ते स्वखुषीनेच केले. घमेंडखोर व उद्धट स्वभावामुळे त्याला बढाया मारण्याची खोड जडली. वास्तविक विद्यार्थीदशेत अर्जुनाचा व पांडवांचा कर्णाने द्वेष करावा असा कोणताही कटू प्रसंग या शैक्षणिक काळात या विद्यार्थ्यांत निर्माण झालेला नाही. तरीही कर्णाने कौरवांच्या बाजूने लढायचे ठरवले. प्रत्यक्ष कृष्णाने त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला पण त्याने नीतिने वागायचे सोडून दिले, पांडवाच्या बाजूने लढायचं की कौरवांच्या बाजूने लढायचे याचा सारासार विचार न करता कर्ण कारण नसतांना अर्जुनाचा उगीचच द्वेष करू लागला. याचा परिणाम काय झाला हे आपल्याला माहिती आहेच. इतका पराक्रमी आणि शूर योद्धा असूनही त्याच्या गुणांचा काहीही उपयोग झाला नाही. हेच समर्थ सांगत आहेत की नुसते गुण असून उपयोग नाही, नीती आणि सारा सार विचार तितकाच महत्वाचा. म्हणून समर्थ म्हणतात मना सर्वथा नीति सोडू नको हो । मना अंतरी सार विचार राहो ॥ ४ ॥
||
जय जय रघुवीर समर्थ
||
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा । मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची । विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥
संकल्प म्हणजे पुढे काय करायचे आहे त्याचा मनात आलेला विचार. अर्थातच, समर्थ सांगताहेत की आपण पुढील क्रियांबद्दल जे ठरवशील ते केवळ शुद्ध, सत्याला अनुसरून आणि चांगलेच असावे. संकल्प हा निश्चयात्मक असतो आणि विचार किंवा कल्पना अनंत असतात अमुक मिळवावं, अमुक व्हावं, अमुक घडावं, अमुक साधावं, अमुक करावं, अमुक टाळावं, अमुक स्वीकारावं,
अमुक नाकारावं, अमुक टिकवावं असे अनंत विचार आणि कल्पना मनात क्षणोक्षणी येत असतात. त्याच एका कल्पनेला दृढ धरून ठेवले किंवा त्याचा ध्यास लागला की त्याचा संकल्प होतो. आपण जो जीवा पेक्षा जास्त सांभाळतो तो खरा संकल्प. पाप संकल्प सोडून द्यावेत आणि त्या साठी विषयात रमणारे मन भगवंता कडे वाळवावे. भगवांताच्या स्मरणाच्या एकमात्र संकल्पात मन रमून गेले तरच त्याने आत्मकल्याण साधेल भगवंत कडे मन वळवणे हे आपलं मुख्य काम आहे. तेव्हा भगवांताच्या प्राप्तीसाठीचे प्रयतन हा आपला मुख्य संकल्प हवा आणि प्रपंच हा जोडधंदा. प्रपंचात विषय भोगा मध्ये मन रमवू नये. पाप पुण्याचा सामान्यपणे असा अर्थ करता येईल कीं ज्याच्या हिताचे, नुसते वरवरच्या सुखाचे नव्हें, तर अंतिम कल्याणाचे,
तें त्याच्यासाठी पुण्य. शरीरापेक्षा मनाला आणि आत्म्याला अनुकूल असेल ते अधिकाधिक पुण्यकारक.
स्वैराचाराकडून संयमाकडे कडे मन वाळवणे म्हणजे पुण्य मार्गावर जाणे.
आता पाप पुण्याची कल्पना आणि धर्म व नीति या गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत. पाप पुण्याच्या कल्पना सर्वत्र व सर्व प्रकारच्या समाजामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत आहेतच, त्या वेगवेगळ्या असतील; समर्थांच्या काळात त्याची व्याख्या वेगळी असेल आणि आजची वेगळी असेल. अमेरिकेतील पाप पुण्य आणि भारतातील पाप पुण्य वेगळे असेल आणि कदाचित् परस्पर विरोधी असतील. पण भगवंतच्या जवळ नेणारे संकल्प जगात कुठेही आणि केव्हांही तेच राहतील. भगवंता बद्दल चे विचार कायम सत्यच आणि चिरंतन राहतील. म्हणून समर्थ इथे सत्य संकल्प असा शब्द वापरतात आणि पुण्य संकल्प असे म्हणत नाहीत असे मला वाटते. म्हणून ते म्हणतात की भगवंत जवळ नेणारा संकल्प जिवा पलीकडे सांभाळावा.
प्राणापेक्षा तो संकल्प महत्वाचा वाटलं पाहिजे आणि त्यात कधीही खंड पडायला नको म्हणून समर्थ मनाला बजावत आहेत "मना सत्य संकल्प जीवी धरावा”. रूढ अर्थाने स्वाभाविक सत्यसंकल्प,
परोपकार,
गरजू व्यक्तींना दान करणे, त्याग, सेवा, तीर्थयात्रा,
तप,
पूजा,
अध्ययन,
नामस्मरण यासंबंधीचे विचार हे सारे सत्यसंकल्प.
मी संयमाने राहीन, खरे बोलेन, न्यायाने वागेन, दुसर्याला शक्य ते सहाय्य करीन, योग्य आहार घेईन, दुसर्याला लागेल, बोंचेल असे बोलणार नाहीं, करणार नाही. स्वार्थासाठी कोणाची स्तुति करणार नाहीं. मत्सराने निंदा करणार नाहीं, अन्यायाचा प्रतिकार अवश्य करीन पण सूडबुद्धीने वागणार नाही, असे कित्येक विचार सत्यसंकल्पांत रूढ अर्थाने मोडतात. पण या संकल्पामुळे पुण्य मिळेल पण ते सगळे खरे सत्य संकल्प होऊ शकत नाहीत. समर्थांना इथे फक्त भगवंता जवळ नेणारे संकल्प म्हणजेच भक्ती मार्गात वर्णन केलेले संकल्प फक्त अभिप्रेत आहे.
शरीर, मन, बुद्धि यांना आपापल्या पातळीवर कांहीं आवश्यकता असतात व त्या पुर्या करणेहि इष्ट असते. आवश्यकतेच्या मर्यादेच्या आंत त्यांची पूर्तता करणे यांत वाईट कांहींच नाहीं. परंतु मोहाने ही मर्यादा कळत नकळत ओलांडली जाते. सुखाच्या कल्पना, अति विषयासक्ति आणि विकृति, विकार या क्रमाने मूळच्या आवश्यकते पेक्षा जास्त विकारांच्या आधीन होणे हितकारक नाही. अति पैसे, अति महत्वाकांक्षा,
अति मोह, अति क्रोध, अति मत्सर या वाटेवर मनुष्य गेला तर षडरिपु मनुष्याच्या वृत्तीवर वाईट परिणाम होतो आणि अधःपात होऊ लागतो आणि त्याची परिणति शेवटी लोकांमध्ये अशा व्यक्तीची छीः थूः होण्यांत होते. भारतीय क्रिकेट चा कप्तान अझरुद्दीन याचे उत्तम उदाहरण देता येईल. अझरुद्दीनकडे फलंदाजीचे कौशल्य होते, धावा निघत होत्या, पैसे अमाप होते, कप्तानपद मिळालेलं होते पण विकारांच्या आहारी जाऊन MATCH FIXING
मधून अजून पैसे मिळवण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. त्यामुळे त्याची समाजात छी थू झाली आणि त्याला शिक्षा सुद्धा झाली. म्हणूनच समर्थ सांगतात त्याप्रमाणे
"विकारें घडे हो जनीं सर्व ची ची" हा व्यावहारिक नियम फार महत्त्वाचा आहे. हा धाक जर प्रत्येकाच्या मनांत राहील तर दुर्वर्तन होण्याचे कारणच राहणार नाही.
||
जय जय रघुवीर समर्थ ||
||
जय जय रघुवीर समर्थ
||
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥
आपल्या समाजात एक चुकीचा समज आहे की अध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणारे लोक मनाने कमकुवत असतात आणि त्यांना संकटांना तोंड द्यायची ताकद नसते. ते रामाचा आधार शोधतात कारण त्यांना मानसिक शक्ती कमी असते आणि ते खूप घाबरट असतात. या श्लोकात समर्थांना सांगायचे आहे की ज्या क्षणी मनुष्य साधना करायला सुरुवात करतो त्याने लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की लोक निंदा, विरोध आणि टिंगल करणारच आणि याला तोंड देण्यासाठी त्याने स्वतः चे मानसिक बळ वाढवणे गरजेचे आहे. साधना सुरु केल्यानंतर धैर्याने अशा अपमान आणि टिंगल करण्याऱ्या लोकांना तोंड द्यायला शिकावे. या शिवाय जिद्द हवी आणि हतबलता येऊ देऊ नये. आपण काकस्पर्श हा मराठी चित्रपट बघीतला होता का? त्या मध्ये स्वातंत्र पूर्व काळात बाल विधवांचे कसे हाल व्हायचे याचे चित्री करण आहे. त्याच काळातील एक बाल विधवे चे आयुष्य कसे बदलले याची गोष्ट ऐका. वयाच्या दहाव्या वर्षी एक मुलगी बालविधवा झाली. घरच्यांनी तिच्या हाती एकनाथी भागवत सोपवलं. सुदैवाने माहेरी मुलीला अक्षर ओळख झाली होती. त्यामुळे निदान या भक्तिमार्गावरची वाटचाल तरी सुरू झाली. मिरजेला, आपल्या सासरच्या अंगणात एक बाल विधवा मुलगी एकनाथी भागवत वाचत बसलेली असता दारात एक तेजपुंज व्यक्ती उभी राहिली. त्यावेळी तिच्या सासूबाईंनी त्यांना दुधाची भिक्षा वाढली नाही, म्हणून ती मुलगी नाराज झाली. पुढे पुन्हा समर्थाची अशीच अंगणात हाक आल्यावर त्या मुलीने भिक्षा वाढली आणि काही प्रश्न विचारले. समर्थानी अभंगात गुंफून तिला उत्तर दिले. या नंतर समर्थांची कीर्तने ऐकून ही मुलगी भारावून गेली. प्रत्येक किर्तना मध्ये पुढच्या रांगेत बसून एकदम तल्लीन होऊन भजन म्हणायची आणि किर्तन संपल्यावर समर्थांना अनेक शंका विचारात होती. त्या वेळेच्या समाजाच्या डोळ्यात ही गोष्ट भरली आणि समाजातील काही लोकांनी तिच्या घरच्यांना कानावर हे घातले. लोकांची निंदा चालूच होती. कानावर जाईल अश्या पद्धतीने नको ते बोलणे सुरु होतेच. तिला त्रास देण्यात इतर स्त्रिया आणि इतर विधवा सुद्धा आघाडीवर होत्या. सासरची मंडळी मुद्दाम तिला जास्त काम सांगत म्हणजे समर्थांच्या कीर्तनाला जायला उशीर व्हावा किंवा जाताच येऊ नये. नंतर काही दिवसांनी समर्थ कोल्हापूरला गेले असे कळले. ह्या मुलीने सुद्धा माहेरपणाचे निमित्त साधून कोल्हापूरला जाण्याची परवानगी मागीतली. परवानगी मिळाल्यावर दुसऱ्याच दिवशी ती मुलगी चालत मिरजेहून कोल्हापूर आली. कोल्हापूरला समर्थांचे कीर्तन अंबाबाईच्या देवळात होते. माहेरी आल्यावर लोकांची निंदा आणि गाऱ्हाणी आता आई वडीलांकडे जाऊ लागली. काही दिवस आई वडील गप्प बसले पण लोकांचे टोचून बोलणे सुरूच होते. तिचे राम नाम सुरूच होते. एके दिवशी तिने मनाचा हिय्या करून समर्थांना आपल्याला त्यांच्या बरोबर मठात घेऊन जाण्याची विनंती केली. ती म्हणाली आज पर्यंत जेवढे कष्ट केले त्याच्या पेक्षा दुप्पट कष्ट मी देवाच्या सेवेसाठी करू इच्छिते. मला रामाच्या सेवे साठी रुजू करून घ्यावे. पण समर्थ म्हणाले की आम्ही राना वनात कुठेही जातो त्यामुळे तुला ते जमणार नाही त्यामुळे योग्य वेळ आली मी स्वतः येईन आणि तुला घेऊन जाईन. इतके ऐकल्यावर तिला हायसे वाटले. हा सगळा प्रसंग तथाकथित कुटाळ लोकांनी ऐकला आणि तिच्या वडिलांचे कान भरले आणि आगीत तेल ओतले. त्या मुलीने आपली बाजू सांगायचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही आणि शेवटाचा उपाय म्हणून आई वडिलांचा तिला डांबून ठेवले. गुरु बरोबर न्यायला तयार नाहीत आणि आई वडील यांचा प्रेमाचा आधार तुटला अशा बिकट अवस्थेत ती सापडली होती. वडिलांनी कीर्तनाला जाणे बंद करण्यास सांगितले पण त्या मुलीने ऐकले नाही कारण तिचे गुरु वरचे प्रेम आणि तिची अध्यात्मिक उन्नत्ती करण्याची ओढ खूप जबरदस्त होती. सामाजिक निंदा आणि आई वडिलांनी कीर्तन प्रवचनांवर घातलेली बंदी याला धौर्यानें तोंड दिले. लोकांची पर्वा न करीत सगळ्यांचे नीच बोलणे सहन करत तिचा राम नामाचा जप सुरूच होता. आई वडिलांचा संयम तुटला. मुलगी ऐकतच नाही त्यामुळे कुळाला कलंक लागेल म्हणून सख्या मुलीवर विष प्रयोग केला. खोलीत कोंडले. समाजानं धिक्कारल्यावर ज्या आई च्या कुशीत शिरायचे त्याच आईने आणि वडिलाने तिला मारून टाकायचा कट रचला होता. इतक्या टोकाचे पाऊल उचलले कारण त्या वेळेची विधवा मुलीनं असे बैराग्याच्या नादी लागण चालत नसे. समाजाला तिची अध्यात्मिक उन्नती बघवली नाही.
आपल्याला मरावे लागते याचे तिला वाईट वाटत नव्हते, पण जन्मदात्यांच्या हातून विषय प्रयोग पचवणे अशक्य होत होते, शारीरिक वेदना असह्य होत होत्या त्यावेळेस तिच्या लक्षात आले की खोलीत पाण्याचा थेंब नाही, घसा कोरडा पडला, दरवाजे आणि खिडक्या बंद त्यामुळे जीव घाबरायला लागला आणि तिला चक्कर आली. तिने समर्थांची मना पासून प्रार्थना केली की मला शेवटच्या क्षणी तरी तुमचे दर्शन द्या नाही तर माझा नमस्कार तरी स्वीकार करा. तिने मनो मन हात जोडले आणि त्यांना संपूर्ण शरण गेली. आणि काय आश्चर्य म्हणजे समर्थ त्या बंद खोलीत प्रगट झाले. बाहेर आई वडिलाना कोणाचा तरी आवाज ऐकू आला म्हणून खोली उघडली तर त्यांना समर्थ आणि संत वेण्णा बाई दिसले. आई वडिलांना आपली चूक ध्यानात आली आणि त्यांनी सामर्थ्यांचा पायावर लोळण घेतले. घरच्यांनीही मग वेणाबाईला मठात जाण्यास परवानगी दिली. पुढे श्री रामदास स्वामींच्या स्त्री-शिष्यांपैकी फक्त वेणाबाईंनाच उभे राहून कीर्तन करण्याचा अधिकार मिळाला होता. त्यांचा शिष्य संप्रदाय निर्माण झाला होता, ही गोष्ट विशेषच म्हणावी लागेल. हे सगळे या श्लोकाच्या पहिल्या मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावे या ओविंच्या अनुषंगाने सांगितले. संत वेण्णा बाईंनी धैर्याने तोंड दिले आणि समर्थांना अनन्य भावे शरण गेल्या कारण त्यांनी खाली दिलेल्या दोन ओवी आचरणात आणल्या
आता पुढील दोन ओव्यांचा अर्थ बघूया “स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे”.
इथे समर्थ म्हणतात लोकांच्या कडून निंदा होणारच, प्रतिकूल परिस्थिती येणार, इतर संकटे पण येतील तरी आपले मन शांत ठेवून आणि भगवंताच्या स्मरणात रममाण व्हावे. निंदक लोकांशी आपण खालच्या पातळी वर जाऊन त्यांच्याशी वाद घालू नये आणि नम्र पणे उत्तर द्यावे. आपली बाजू समजावून सांगायचा प्रयत्न करावा पण त्यांना सुधारण्याचा नादी जास्त लागू नये. लोकांशी वादविवाद न घालता शांतपणे बोलावे. परमार्थात नम्रपणा खूप महत्वाचा आहे. क्रोधाने साधनेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वाणी एकदम गोड आणि नम्र असावी आणि लोकांना न दुखावता लोकांशी बोलावे. असे सगळे गुण अंगी आत्मसात करणे समर्थांना अपेक्षित आहे.
||
जय जय रघुवीर समर्थ
||
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥
व्यवहारामध्ये प्रत्येक माणसाच्या ठिकाणीं धनेषणा (भरपूर संपत्ती मिळवणे), दारेषणा (दारा म्हणजे स्त्री आणि त्याबद्दल आकर्षण आणि इतर सुखसोयींचा उपभाग घेणे) आणि लोकेषणा (लोकांनी चांगले म्हणावे) या तीन वासना सहजपणे असतात. धनेषणा आणि दारेषणा या तर वैयक्तिक आणि सामाजिक अध:पाताचे मुख्य कारण होऊ शकतात. त्यांतून मुक्त होण्यासाठी लोकेषणेचे आकर्षण उपयोगी पडू शकते पण सध्या समाजात तसे दिसत नाही. सध्या समाजात आपण बघतो आहोत की कोणत्याहो मार्गाने संपत्ती मिळवायची आणि त्यायोगे दारेषणा मिळवायची अशी वृत्ती वाढत चालली आहे. अयोग्य किंवा योग्य मार्गाने मिळवलेली धन-संपत्ती आणि त्यामुळे आपोआप मिळालेली समाज मान्यता यामुळे आपली कीर्ती आपण गेल्यानंतर सुद्धा टिकून राहील असा चुकीचा समज झाला आहे. पण हा समज घालावण्यासाठी समर्थांचा हा श्लोक उपयोगी आहे असे वाटते. कसा ते आपण बघूया - मनुष्याने कितीही संपत्ती, सत्ता आणि इतर सुखे लोकांची पर्वा ना करिता मिळवली तरी त्याची बोचणी आतून राहतेच. धनेषणा आणि दारेषणा वाईट मार्गाने मिळवल्या नंतर मिळवायला नंतर त्याला RECOGNITION (समजा मान्यता) ची गरज वाटू लागते. समाजात गुंड प्रववृत्तीचे लोक राजकारणात उडी घेण्याचे हेच कारण आहे. त्यासाठीच अति श्रीमंत माणसे दान धर्म करून RECOGNITION मिळवायचा प्रयत करतात. सिनेकलाकार नंतर राजकारणात शिरून समाजा मधील पत मिळवण्याचा प्रयत्न करतात ते लोकेषणेचे आकर्षण त्यांचे अतृप्त राहते म्हणूनच. सत्ता आणि संपत्ति ज्यांच्याजवळ आहे अशा व्यक्ती स्वत:च्या नांवाच्या संस्था काढणे, स्वतःचे पुतळे उभारणे, इमारतीवर आपल्या नांवांच्या पाट्या लावणे अशासारख्या गोष्टी करून आपली कीर्ति टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. चारित्र्य आणि सद्गुणाचा पत्ता नसला तरी पैशाच्या बळावर अशी कीर्ति त्यांना कांहीं काळ विकत घेता येते हे खरे, पण ही खरी कीर्ति नव्हे व समर्थांना ती अभिप्रेत नाहीं. ही एक प्रकारची प्रसिद्धि आहे. संपत्तीच्या बळावर गरजू लोकांची कांहीं नड भागवावी आणि त्यांच्यावर कृतज्ञता लादून स्वतःचे नांव मिरवून घ्यावे आणि त्यांतहि तीन पिढ्यांचा उल्लेख व्हावा असा हा धंदा आहे. मंदिराला एखादे चांगले चित्र किंवा किंमती वस्तू भेट म्हणून द्यावे व त्यात आपल्या धंद्याची, दुकानाची, जाहिरात करून घ्यावी हे याचे अजून एक उदाहरण.
आपण विचार केला तर असे दिसते की अशा धनेषणा, दारेषणा आणि लोकेषणा मिळवलेले किती लोकांची कीर्ती ते गेल्यानंतर राहते? काही वर्षात त्याचे नाव पुसून टाकले जाते आणि समाजात नवीन कोणी धनाढ्य जन्माला येतो. माणसाने अशी थोरवी संपादन केली पाहिजे की त्याने स्वतः प्रयत्न न करताही लोकांनी पिढ्यान्पिढ्या त्याचे गुण गात राहिले पाहिजे. शंकराचार्य,
ज्ञानेश्वर,
तुकाराम,
रामदास,
शिवाजी,
अहिल्याबाई हीं त्यांची उत्कृष्ट उदाहरणे. अशी कीर्ति सत्तेनें वा संपत्तीने विकत घेता येत नाही. ती शील, चारित्र्य,
कर्तृत्व,
औदार्य,
पराक्रम,
जनहिताची तळमळ इत्यादि सद्गुणांच्या बळावर प्राप्त होत असते. त्यासाठी माणसाला नि:स्वार्थपणे श्रम करावे लागतात आणि तेच चंदनाप्रमाणे झिजावे या उपमेनें समर्थ स्पष्ट करीत आहेत. चंदन जसे सुगंधी आणि शीतल असते आणि आपल्या या गुणांचा लाभ लोकांना व्हावा म्हणून ते स्वतः झिजत राहते, त्याप्रमाणे माणसाने सद्गुणी व परोपकारी असले पाहिजे. श्रमाला, त्यागाला न कंटाळता लोकांना सुखावण्यासाठी,
समाजाच्या देशाच्या हितासाठीं,
सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यावेळी स्वत:च्या शरीरसुखाकडे दुर्लक्ष करावें लागले तरी ते श्रेयस्कर मानले पाहिजे. सहाणेवर उगाळल्या जाणार्या चंदनाची उपमा देण्यांत एवढा सर्व भाव अभिप्रेत आहे. हा त्याग, हे कष्ट; ही निरपेक्ष वृत्ती आणि हे परिश्रम म्हणजेच चंदनासारखें झिजणें कोणाकरितां असावे? या प्रश्नांचे उत्तर देतांना समर्थ चौथ्या ओवीत लिहितात कीं आपल्या वर्तनानें,
आपल्या कृतीने सज्जनांचे अंतःकरण प्रसन्न झाले पाहिजे, त्यांच्या मनाला समाधान झाले पाहिजे. आई वडील मुलांसाठी जे कष्ट घेतात त्यात काही प्रमाणात प्रेम, कर्तव्य भावना आणि स्वार्थ असतो. म्हातारे झाल्यावर आपल्याला आधार मिळावा हा स्वार्थ आणि लोकांनी आपल्या मुलांना चांगले म्हणावे ही लोकेषणा त्या मध्ये असतेच, म्हणून चंदनासारखे झिजणे हे फक्त सज्जनांना सुख मिळावे या साठी असावे असे समर्थ म्हणतात.
प्रश्न आता उरतो की सज्जन म्हणजे कोण? माझ्या मते सज्जन म्हणजे संत, सद्गुरू किंवा भगवंत. म्हणजे दास्य भक्ती करण्यात आपला देह झिजवावा अशा संतांची सेवा करणे समर्थांनी अपेक्षित आहे. दुसरे उदाहरण म्हणजे बाबा आमटे किंवा प्रकाश आमटे यांच्या सारखे निरपेक्ष वृत्तीने रुग्णाची सेवा करणे याला सुद्धा सज्जनाची सेवा करणे म्हणतात. असे अनेक लोकं मोबदला आणि प्रसिद्धी च्या मागे न लागत सेवा करतात त्यांना सज्जन असे म्हणता येईल. त्यांची कीर्ती सुद्धा ते गेल्यावर अनेक वर्ष टिकून राहते धनवान व्यापारी, दानशूर उद्योगपती,
बलाढ्य आणि पराक्रमी राजे, धुरंधर राजकारणी यांची कीर्ती ते जिवंत असे पर्यंत राहते पण सज्जनांचे अंतःकरण सुखावेल असे काम करतांना देह चंदना सारखा झिजवला तर सामान्य माणसाची कीर्ती सुद्धा तो गेल्या नंतर टिकेल असे समर्थांना सांगायचे आहे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे । अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।न होता मनासारखे दुःख मोठे ॥ ९ ॥
इथे समर्थांनीं किती आणि कसे पैसे कमवावे याचे मार्ग दर्शन केले आहे. समर्थ म्हणतात आपण जरुरी पुरतेच पैसे कमवावे. या ओवी मधील "पूढिलांचे"
या शब्दा द्वारे त्यांना असे म्हणायचे आहे कि दुसऱ्याचे पैसे आपण ओरबाडून घेऊ नयेत. म्हणजेच वाईट मार्गाने पैसे कमावणे चुकीचे आहे. आपल्या बरोबरचे नातेवाईक किंवा मित्र यांच्या कडे असलेली संपत्ती आणि आपली संपत्ती याची तुलना करू नये. उदा- त्याने २० लाखाची मोठी गाडी घेतली, की मला सुद्धा तशी गाडी घ्यावीशी वाटते, तसेच FLAT,
MOBILE, FOREIGN VACATIONS च्या बाबतीत होते. या इच्छा पूर्ण करण्या साठी आपण पैसे वाट्टेल त्या मार्गाने पैसे कमावण्याचा मागे लागतो आणि त्यामुळे आपले मनःस्वास्थ्य हरवून बसतो. अजून एक उदाहरण म्हणजे SHARE MARKET
INTRA DAY TRADING चे आकर्षण. याचे कारण प्रत्येकाला झटपट श्रीमंत होण्या साठी हा मार्ग सोपा वाटतो. याचा अर्थ SHARE MARKET
मध्ये दीर्घ काळा साठी पैसे INVEST करणे वाईट नाही परंतु INTRA DAY
TRADING मध्ये झट पट पैसे कमावणे चूक आहे. DAILY ट्रेडिंग म्हणजे एक प्रकारचा जुगार आहे हे लक्षात ठेवणे महत्वाचे. "पूढिलांचे" या शब्दाचा अजून एक अर्थ म्हणजे "या जगातून निघून गेले आहेत ती पुढे गेलेली लोके". आपल्या हक्काची नसलेली वडिलोपार्जित संपत्ती घेण्या साठी कोर्ट कचेरीत खोटे पुरावे उभे करून संपत्ती साठी भांडत बसू नये. महाभारत ग्रंथांमध्ये दुर्योधनाला पांडवांची संपत्ती हवी होती आणि त्या वरून अख्खे महाभारत घडले. तेच कैकयी ने रामाच्या ऐवजी भरताला राज्य मिळावे या साठी चुकीचा मार्ग निवडला. "नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे
" हे समजा दुर्योधनाने किंवा कैकयीने आचरणात आणले असते तर रामाला आणि पांडवांना वनवासात धाडण्याची बुद्धी त्यांना झालीच नसती
सध्या च्या काळात अंबानी बंधू, सिंघानिया
(बाप आणि मुलगा) असे आपल्या आजू बाजूला अनेक उदाहरणे आहेत. नौकरीच्या ठिकाणी होणारी CORPORATE
RAT RACE म्हणजे एक प्रकारचे "पूढिलांचे द्रव्य घेणे "आहे. हे सगळे "अति स्वार्थ" बुद्धी या मध्येच मोडते. आता असे वागण्यामुळे मनःशांती आणि असामाधान पदरात पडते. पैशाच्या मागे धावून, स्वतः ची lifestyle
upgrade करून समाधान मिळत नाही. कारण दर वेळेस या RAT RACE मध्ये तुम्ही जिंकाल असे कसे शक्य आहे? म्हणजेच मना सारखे झाले नाही की असमाधान आणि दुःख पदरात पडते. याचा अर्थ आपले कर्तव्य न करता कामचुकार पणा करणे योग्य नाही. आपल्याला समाजात simple life
style मध्ये राहतां येईल इतका पैसा मिळाला की त्यात समाधान मानावे. समर्थ म्हणतात की कितीही संपत्ती जमा केली तरी ती कमीच वाटते आणि हाव संपत नाही. आत्ता पर्यंत जगात एक सुद्धा माणूस असा सापडणार नाही की जो म्हणतो कि माझ्या कडे भरपूर पैसे आहेत आता मला अजून पैसे नको.
चुकीच्या मार्गाने पैसे कमवले तर पैसे मिळतील आणि तात्पुरते विषय सुख मिळेल पण त्याच बरोबर आपल्याला पाप लागते. चांगल्या मार्गाने कमावलेला पैसा जास्त समाधान देईल आणि पुण्यवान बनवेल. आपल्या पापाचे प्रायश्चित्त या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी दुःख भोगून संपवावी लागतात. त्यामुळे या श्लोकात सांगितल्या प्रमाणे वागले तर आपण कायम समाधानी राहू. समर्थ आयुष्यभर गरीब राहा असे इथे सांगत नाही आहेत, चुकीच्या मार्गाने श्रीमंत होऊ नका असे सांगत आहेत. दोन्ही मध्ये खूप फरक आहे. पैसे कमावणे वाईट आहे असे नाही पण पैसाच सर्वस्व असे वाटणे चुकीचे आहे. Happiness
comes not by making money, but by making something worthwhile with money. त्यामुळे कमवून ठेवलेले पैसे चांगल्या काम साठी दान करणे महत्वाचे. त्याने समाधान जास्त मिळते
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
सदासर्वदा प्रीतिरामी धरावी। सुखाची स्वये सांडि जीवी करावी॥
देहदुःखते सूख मानीत जावे। विवेके सदास्वस्वरूपी भरावे ॥१०॥
मनुष्याला प्रेम करायला शिकवावे लागत नाही कारण ते उपजत आणि जन्मतः असतेच असते. लहानपणी बाळ आईवर प्रेम करते आणि तारुण्यात नैसर्गीकरित्या पुरुष स्रीवर आणि स्त्री पुरुषावर प्रेम करायला शिकते. समर्थांनी या श्लोकात तीच प्रेम भावना आपल्याला भगवंताकडे वळवायला सांगतिले आहे. प्रश्न असा आहे की निर्गुण निराकार परमेश्वर असतांना त्याच्या सगुण साकार मूर्तीची पूजा कशी करायची? त्यासाठी समर्थानी दासबोधाच्या चौथ्या दशकात मध्ये नवविधा भक्ती मध्ये सोप्या शब्दात त्याचे वर्णन केले आहे. त्याचदशकात आठव्या समासात "सख्य भक्ती" मध्ये कशी करावी हे समजावून सांगितले आहे. पुर्वीच्या काळी लग्न ठरतांना मुलीला तिच्या पतीचे नीट दर्शन पण होत नसे. पण तरी तिच्या मनात त्याच्या विषयी प्रेम भावना फुलत असे. त्यांचं प्रेम भावनेतून ती वधू आपल्या पतीला आवडेल तसे वागायचा प्रयत्न करायची आणि ते फक्त निस्सीम प्रेमा मुळे शक्य होत असे. त्याच प्रमाणे प्रत्येक साधकाने भगवंत आपला सखा आहे असे समजून त्यावर प्रेम करावे. त्यासाठीं देवाला जसे आवडते त्याप्रमाणे वागावे. देवाच्या सख्यत्वासाठी स्वतः ची आवड बाजूला ठेऊन अनन्य भावाने देवाला शरण जावे. एक आई जसे बाळाला त्याला त्रास होऊ नये म्हणून गरोदरपणात अनेक पथ्य पाळते आणि जन्म दिल्यानंतर बाळाच्या आवडी निवडीचा विचार करून तसे वागते तसे आपण भगवंताशी वागावे असे समर्थ इथे सांगत आहेत. बाळासाठी रात्री जागरण करतांना तिला देहाला कष्ट पडत नाहीत. याचे कारण तिच्या मनात प्रेम भावना उपजत असतात. त्याच प्रमाणे आपण आपले मन भगवंतापाशी अर्पण करावे. महाभारतात गांधारीचे उदाहरण आहे. स्वतः डोळस असतांना पती आंधळा असल्यामुळे तिने स्वतः सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधली. म्हणजेच स्वतः च्या सुखाचा तिने त्याग केला. असलेली शक्ती विसरणे आणि सुख सोडणे हे फक्त प्रेमामुळेच शक्य होते. गोपींनी कृष्णावर केलेले प्रेम, समर्थ रामदास आणि त्यांचे शिष्य कल्याण स्वामी, गोंदवलेकर महाराज आणि आनंद सागर महाराज अशी अनेक उदाहरणे गुरु शिष्यांच्या प्रेमाचीच आहेत. भाऊसाहेब केतकर यांचे गोंदवलेकर महाराजांच्यावर असलेल्या प्रेमामुळे महाराजांनी देह ठेवल्या नंतर सुद्धा १२ वर्षें ते गोंदवल्यात राहिले. मुंबईत आलेल्या प्लेगच्या साथीत बाबा बेलसरे आपले राहते घर सोडून आणि असलेलं सगळे सामान देऊन टाकून फक्त एक बॅग सामान घेऊन मालाडला राहायला आले आणि अवघड परिस्थितीला तोंड दिले. बाबा बेलसरे आणि भाऊ साहेब यांची दोन्ही उदाहरणे म्हणजे असलेल्या सुखाचा त्याग करणे म्हणजेच "सुखाचे स्वये सांडी जीवी धरावी" या ओवीची मूर्तीमंत उदाहरणे आहेत. पुढच्या ओवी मध्ये समर्थ देह दुःखा बद्दल सांगत आहेत. ज्या वेळेला दुःख देणारे, वाईट प्रसंग किंवा परिस्थिती येते, त्यावेळी माणसाला अत्यंत वेदना होतात. मनात द्वंद्व, क्षोभ निर्माण होतो. मनाच्या अपेक्षेप्रमाणे घडत नसल्यामुळे मन उद्विग्न होतं. निराश होतं. याप्रमाणे जीवनात. तिसऱ्या दशकात दासबोधात तीन प्रकारची दुःखे सांगितली आहेत. 1)आध्यात्मिक.
2)आधिभौतिक
3) आधिदैविक.
आध्यात्मिक दुःख - म्हणजे शारीरिक दुःख. यामध्ये शारीरिक वेदना, अनेक प्रकारच्या व्याधी येतात. *आधिभौतिक दुःख -आपल्या भोवती असलेल्या अनेक लोकांच्या अनुषंगाने तसेच चोर, पशु, सर्प इत्यादींच्या पासून होणारा उपद्रव म्हणजे आधिभौतिक दुःख- ज्यावर माणूस नियंत्रण करू शकत नाही, असे आकस्मिक संकट म्हणजे दुःख. उदाहरणार्थ नैसर्गिक उत्पात, अतिवृष्टी,
अनावृष्टी,
ज्वालामुखी,
भूकंप इत्यादी. आपल्या चांगल्या-वाईट कर्माची फळे भोगावी लागतात. माणूस शक्ती, पैसा, सत्ता यांच्या जोरावर अनेक बरीवाईट कर्मे करीत असतो. माणसाने केलेल्या कुकर्माची फळे या जन्मी किंवा मृत्यूनंतरही भोगावी लागतात. जीवाची त्यातून सुटका नसते. अंगबळाच्या अथवा द्रव्यबळाच्या किंवा सत्तेच्या बळावर नीतिनियम धुडकावून दुष्कर्मे करीत असतो. उन्मत्तपणे जीवांचा संहार करणे त्याला आवडते. तो समाजविघातक कामे करीत असतो. अशा माणसाला मेल्यावर यमयातना भोगाव्या लागतात. त्या यातना म्हणजे आधिदैविक दुःख होय. अशा रीतीने या त्रिविध तापांनी माणूस त्रासला की, तो जीवनाचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. अशी अनेक दुःखे समोर आली की मनुष्याचा देवा वरचा भरोसा उडतो. परंतु असे दुःखद प्रसंग आपल्या प्रारब्धा नुसार येत असतात आणि त्याला आपल्याला भोगुनच संपवावे लागते. त्या मध्ये आपण अधिकाधिक नामस्मरण करून आपले पुण्य वाढवत जावे, हे दुःखे आपल्याला अधिक कणखर बनवायला आले आहे असे मानून त्यातून आपल्याला अधिक चांगले काय करता येईल हे पाहावे. उदाहरण। लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असतांना गीतारहस्य लिहून त्या संकटाचा सामाना केला आणि मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला. संकटे किंवा दुःखाचे प्रसंग आलेले असताना, सामान्य माणसाचं मन डळमळतं. त्याचा आत्मविश्वास आणि धैर्य खचतं. मनात उलटसुलट विचारांचे काहूर माजते तो हताश होतो. निराश होतो. आणि त्यामुळे प्रत्यक्ष दुःखापेक्षा सुद्धा मानसिक यातना त्याला जास्त त्रस्त करतात. समर्थ म्हणतात आपण निश्चल राहावे, मानसिक संतुलन बिघडू देऊ नये आणि घडणार्या घटना स्वीकाराव्या आणि त्यात आपले कल्याण आहे असे मानावे. हे फक्त देवावर भक्ती असेल तरच शक्य असते. भगवंतावर भक्ती आणि प्रेम असेल तर चित्त अखंड ब्रह्मस्वरूपामध्ये दृढ आणि स्थिर होते. समोर आलेला दुःखाचा प्रसंग हा तात्कालिक आहे असा विश्वास भगवंताच्या प्रेमामुळेच निर्माण होतो. आलेले दुःख आनंदाने स्विकारायला शिकावे आणि त्यातच आपले हित आहे असे मानावे. हे करण्यासाठी सगुणाची भक्ती आणि नामस्मरण करावे. महाभारतात कुंतीने देवा कडे मला कायम दुःखातच राहू दे असे मागितले कारण तिची अशी पक्की धारणा होती की त्यामुळे तिची देवाची भक्ती वाढेल. भगवंतावर प्रेम करणारा भक्त कोणताही सुखाचा प्रसंग आला तरी खूप आनंदून, हुरळून जात नाही. यालाच सारासार विवेक असे म्हणतात. असा मनुष्य शांत राहतो. याचं कारण त्याच्या मनातली सुख उपभोगण्याची स्पृहा नाहीशी झालेली असते. भगवंतावर प्रेम करायला लागले की स्वतःच्याच अंतरंगात सुखाचा शोध लागतो आणि त्यामुळे आत्मस्वरूपाचा आनंद प्राप्त होतो. यालाच आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. बहिर्मुख असलेले मन अंतर्मुख झाले की प्रत्येक मनुष्यात भगवंत आहे आणि स्वतःच्या अंतःकरणात सुद्धा भगवंतच आहे याचा साक्षात्कार होतो आणि भक्त आणि परमात्मा एकच होऊन जातात.
||
जय जय रघुवीर समर्थ
||
