अविद्यागुणे मानवा ऊमजेना । भ्रमें चूकलें हीत तें
आकळेना ॥परीक्षेविणें बांधलें दृढ नाणें । परी सत्य मिथ्या
असें कोण जाणें ॥ १४३ ॥या श्लोकाचे दोन अर्थ बघूया.
पहिला अर्थ आपण समर्थांना अभिप्रेत आहे तो बघूया -जे दिसलें तेंच सत्य
मानावें हें काही ज्ञानी माणसाचे पाहणें नव्हे. जड, मूढ व अज्ञानी जीव त्यास सत्य मानतात.
केवळ इंद्रियांना दिसते म्हणून तेच खरे मानू लागलो याला अविद्या म्हणतात . एका माणसाला
स्वप्न पडले आणि स्वप्नात त्याला पुष्कळ द्रव्य सांपडले. पुष्कळ लोकांशी त्याने व्यवहार
केला. पण त्याचे स्वप्न होते हे त्याला नंतर समजले पण झोपेत असतांना तो ते द्रव्य उपभोगत
होता. मनुष्याचा स्वभावच असा असतो की, आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो.
पण आपली कल्पनाच किती संकुचित असते, याचा कोणी विचार करीत नाही. जो कल्पनेच्या पलीकडे
आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसे ओळखता
येईल ? जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे आजमावता
येणार ? माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे, तेव्हां त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान
होणार आहे. अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे. आपल्या
पुष्कळ वस्तू मिळाल्या की आपण सुखी होऊ हा भ्रम या अविद्येमुळे निर्माण होतो. एखाद्या
आंधळ्या माणसाने साखर समजून मीठ खाल्ले, तर ते खारट लागल्यावाचून राहणार नाही. त्याप्रमाणे,
आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली, पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले. पण
ते मनुष्याला मरे पर्यन्त समजत नाही कारण तोच त्याच भ्रमात वावरत असतो. वस्तू मिळवण्यासाठी
धडपडत असतो. त्याला उमजताच नाही काही तो चुकीच्या मार्गावर मार्गक्रमण
करतो आहे. देहच मी आहे हे देहबुद्धीचे लक्षण आहे. अविद्यामय देह मीच आहे या दृढ भावनेने दृश्य पाहिले की तो सर्वस्वी खराच वाटतो. इकडे देहाला सत्य मानले, तिकडे दृश्याला पण सत्य मानले, मायेच्या बळाने दोन्हीकडे भरपूर संशय पसरून ठेवला आहे. आपली देहबुद्धी बळकट करून धीटपणाने ब्रह्मवस्तू पाहण्याचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा हे दृश्य जगत त्यामध्ये आडवे आल्याने परब्रह्माची वाट त्याने अडवली आहे असे दिसून येते. येथे या आत्मज्ञानाच्या क्षेत्रात दृश्याला आपण नुसतं सत्य मानतो असं नव्हे तर ते सत्यच आहे असा निश्चय करतो. त्या भ्रमामुळे अकस्मात केवढा घोटाळा झाला आहे पाहा बरे. हा “देह म्हणजे मी” या नावाचे नाणे आपण हातात
धरून ठेवले आहे. हे नाणे खरे आहे असे आपल्याला जन्मल्यापासून शिकवले जाते. ते नाणे
खोटे आहे हे संत आपल्याला सारखे सांगत असतात तरी आपण ते खोटेच नाणे प्रपंचाच्या बाजारात
सुख विकत आणायला नेतो पण त्या ऐवजी दुःख पदरात पडते जातो आणि दुःख विकत घेऊन येतो.
दुसरा अर्थ:- भरपूर पैसा
मिळवला की जगातील सर्व सुखं आपल्या पायाशी लोळत पडतील असा समज भौतिकवादाच्या अविद्ये मुळे झालेला बध्द मनुष्याला
असतो. त्यासाठी त्याचे जन्म भर राबून पैसे कमावणे सुरु असते. भगवंताचे प्रेम आणि नामस्मरण
भक्ती याची काही एक गरज नाही या भ्रमात तो जगतो. पण आयुष्याचा शेवटी त्याला समजते की त्याने जे नाणे
(पैसे) घट्ट धरून ठेवले होते त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे पैसा आणि त्यातून
मिळणारे सुख हे मिथ्या आहे आणि सत्य फक्त भगवंताचे नाम हे त्याला उमगते. पैसा आला तर
भगवंताच्या इच्छेने आला, आणि यदाकदाचित तो गेला, तर भगवंताच्या इच्छेने गेला, हेच सत्य
आहे हे शेवटी समजते पण त्याला उशीर झालेला असतो
।।जय जय रघुवीर समर्थ ।।
