नको रे मना वाद हा खेदकारी। नको रे मना भेद नानाविकारी॥नको रे मना शीकवूं पूढिलांसी। अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥
अहंकारामुळे आपल्या आयुष्यात किती नुकसान होऊ शकते याचे आधी पण अनेक श्लोक येऊन गेले आहेत. पारमार्थिक प्रगतीमध्ये अहंकार हा मुख्य शत्रू आहेच. त्याला उपाय प्रत्येक गोष्टीच्या मागे "राम कर्ता " भावना ठेवणे किंवा शरणागती पत्करणे. तसे केल्या शिवाय आत्मज्ञान होणार नाही. पण प्रपंचात सुद्धा अहंकाराने आपले नुकसान होते. कसे ते या श्लोकात त्यांनी अतिशय साध्या शब्दात सांगितले आहे. अहंकारामुळे वादविवाद वाढत जातात आणि त्यातून खेद वाढत जातो. आपल्या मनात इतरांच्या विषयी भेद निर्माण होतात आणि त्यामुळे द्वेष मत्सर वाढून त्यातून मनस्ताप वाढत जातो. शेवटी शारीरिक विकार सुरु होतात. तिसरी गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्याला शिकवायला जातो आणि त्याने ऐकले नाही परत आपल्याला दुःख होते. हे तीन दुष्परिणाम एकट्या अहंकारामुळे होतात. अहंकार, EGO, ह्याचा मुळ अर्थ, मी किंवा माझे, मीपणा असा होतो. अर्थातच तुम्ही कोण आहात ? ह्याचं तुम्ही स्वतःला दिलेलं उत्तर म्हणजे अहंकार. आपण स्वत:बद्दलची केलेली संज्ञा(भाषा) म्हणजे अहंकार. आपली स्वतःची ओळख(IDENTITY) म्हणजे अहंकार. आपण जर घरात असू तर आपला अहंकार एक बाप, एक आई, एक मुलगा, एक मुलगी, एक पती/पत्नी, एक बहीण/भाऊ इत्यादी असेल. जर बाहेर कामात असू तर आपला अहंकार एक मालक,एक कर्मचारी, एक विक्रेता, एक कार्यकर्ता, एक शिक्षक/विद्यार्थी, एक ग्राहक, एक प्रवासी, एक पोलीस, एक चोर इत्यादी. अनंत अशी उदाहरणे आहेत. मुद्दा असा की आपला अहंकार क्षणा क्षणाला आपल्या भोवतालच्या परिस्थितीनुसार बदलत आहे आणि त्यामुळे आपल्याला पण त्या अहंकाराप्रमाणे (ओळखीप्रमाणे) वागायचे आहे. हे एका अभिनेत्यासारखे आहे जिथे चित्रपटाप्रमाणे किंवा मालिकेप्रमाणे प्रत्येक वेळी तुमची ओळख (role/रोल) बदलतेय. प्रत्येक ओळखीच्या काही मर्यादा आणि जबाबदार्या आहेत. त्या पाळल्या तर तो रोल यशस्वी होतो. आणि अभिनेत्या सारखा आपल्याला अभिनय तर करायचाय. म्हणजे जरी भांडण करण्याची गरज भासली तरी ते भांडण फक्त उद्देश साध्य करण्यासाठीच होईल, ते भांडण आपली हताश बाजू मांडण्यास मदत करेल कारण आपल्याकडे दूसरा पर्याय नव्हता. पण आजकाल ही अशी भांडणं संपता संपत नाही , आणि ही माणसाला आतमधून पण खातात. त्यालाच समर्थ "नको रे मना वाद हा खेदकारी" इथे असे म्हणतात. आणि अशाच वादातुन मोठे किंवा कायमचे वितुष्ट तयार होते. त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींकडे बारकाईने लक्षं दिलं तर कळेल की अशा भांडणा मध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींच्या अहंकारला महत्व चिकटलेलं असतं आणि ह्या महत्वाला ठेच पोचली असते म्हणून जरी भांडणा वर तोडगा निघाला तरी शत्रुत्व आणि कडवटपणा संपता संपत नाही. कामाचा दर्जा काम ,श्रीमंत-गरीब, विद्वान-अडाणी, स्त्री-पुरुष असा भेद अहंकारामुळेच आपल्या मनात निर्माण होतात. एकदा मनात भेद निर्माण झाला की विरुद्ध बाजूच्या व्यक्तीला प्रत्येक बाबतीत हरवण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जातात . त्या मध्ये काही यश येते कधी अपयश. यश आले तर अहंकार अधिक वाढत जातो आणि अपयश आले तर क्रोध आणि मत्सर निर्माण होतो . त्यातून शारीरिक विकार वाढत जातात. “नको रे मना भेद नानाविकारी” . आपण कोणाला काही उपदेश केला तेव्हा तो आपण हट्टाने धरून ठेऊ नये. समोरच्याला पटले तर त्याने ऐकावे नाहीतर तर आपण सोडून द्यावे. देव त्याचे भले करील अशी त्रयस्थाची भावना ठेवून आपण इतरांना सांगावे. आपल्यालाच सर्व कळते आहे अशी आपली अहंकाराची, भावना नसावी पण आपण सामान्य माणसे मात्र आपल्या मताचा दुराग्रह केवळ मीपणापोटी धरतो. आपण मीपणा ठेवतो तेच मग दुसऱ्याला उदाहरण घालून दिल्यासारखे असते. नको रे मना शीकवूं पूढिलांसी।
सगळ्यांना लागू होईल असा उपदेश समर्थांनी केला आहे. आता तोच श्लोक दोन पिढ्यान मधील अंतर कमी करायला कसा उपयोगी पडेल ते बघू.
१)दोन पिढीमधील अंतरामुळे मुळे घरात आई मुलगी, वडील मुलगा यामध्ये अनेक छोटे मोठे वाद नेहेमीच होत असतात आणि त्याने घरातील वातावरण बिघडू शकते. त्याचे सुद्धा मूळ कारण अहंकारच. नवीन पिढीला तारुण्यामुळे आलेली मस्ती असते आणि त्यामुळे अहंकार असू शकतो मागच्या पिढीला अनुभवाचा अहंकार असतो आणि पुढील पिढीचे प्रेम सुद्धा असते. अशा वेळेस दोन्ही पिढीने सामंजस्याने सांभाळून घेतले तर नक्कीच श्रेयस्कर. पण मागील पिढीने अध्यात्मिक ग्रंथ वाचूनतरी त्यात प्रत्येक ठिकाणी लिहिल्या प्रमाणे आपला अहंकार कमी करावा असे समर्थांना इथे सूचित करायचे आहे. मागील पिढीने तरुणपणी अहंकारी वृत्तीने वागले होते त्यामुळेच या वयात त्यांना अहंकार सोडता येत नाही. तारुण्याची मस्तीमुळे अहंकार कमी होणे अजूनच अवघड . आणि एका पिढीने अहंकार कमी करून वाद कमी करणे समर्थांना इथे अपेक्षित आहे.
२) पालकांनी आपल्या दोन भावंडांमध्ये लहानपणा पासूनच भेद करू नये. कारण तसे केल्याने भावा भावांमध्ये वितुष्ट निर्माण होते आणि वाद विकोपाला जाऊ शकतो . म्हणून भेद केल्यानं घरात वादविवादाला आणि त्यामुळे विकारांना निमंत्रण दिल्यासारखे होते.
३)पुढील पिढीला मागची पिढी कायम सूचना देत असते . त्या सूचना अनुभवातून आणि काळजीने आलेल्या असतात तरी पुढील पिढीचा अहंकार जास्त असल्याने ती पिढी ऐकणार नाही असे गृहीत धरून एकदाच किंवा फार फार तर दोनदा नम्रपणे सांगावे . नाहीतर रामाची इचछा असे समजून आपला अहंकार कमी करावा. मागल्या पिढीने आपण नकळत "मी पणाने" किंवा "अहंकाराने " वागून पुढील पिढीमध्ये सुद्धा अहंकाराची बीजे पेरतो हे लक्षात घेणे जरुरी आहे.
|| जय जय रघुवीर समर्थ ||

