।
भजावा जनीं पाहता राम एकू ।
करी बाण एकू मुखी शब्द एकू ॥
क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू ।
धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥
"जय जय राम कृष्ण हरी " हा वारकरी भक्तांचा मंत्र सगळ्यांना माहिती आहेच. पण त्यात जो देवाचा क्रम आहे त्याला खूप महत्व आहे. रामचे चरित्र सर्व सामान्य लोकांना अनुकरणीय आहे म्हणून त्याचे नाव पहिल्यांदा घेतले आहे . रामाचा आचार , कृष्णाचा विचार आणि त्याच बरोबर विठ्ठल नामाचा उच्चार करावा म्हणून हा मंत्र आहे. त्याच मंत्रातील प्रभू राम चंद्राच्या सद्गुणांचे वर्णन समर्थ या १३१ क्रमांक च्या श्लोकात करत आहेत. भक्ताच्या आयुष्यात येणारा सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो किंबहुना असायला हवा तो म्हणजे चरित्र अभ्यासाचा. आणि केवळ भक्तीमार्ग नव्हे तर कुठल्याही विषयाशी निगडीत कुठल्याही व्यक्तीला जेव्हा आपण आदर्श म्हणून स्वीकारतो , तेव्हा त्यांचा चरित्र्य अभ्यास ही त्या साधकाच्या दृष्टीने असणारी फार महत्त्वाची गोष्ट असते ...आपण ज्या व्यक्तीचं अनुकरण करत असतो ...ती व्यक्ती प्रत्येक वेळी सहवासाच्या रूपानेच आपल्याला मिळते असं नाही ...तर तिच्या चरित्रा मधल्या कथा, जीवनातले प्रसंग या गोष्टीतूनही ती व्यक्ती आपल्याला कित्येकदा भेटत राहते आणि अर्थात जेव्हा आपण त्या व्यक्तीचं अनुकरण करू लागतो तेव्हा आपोआप तिच्यातले बरेच गूण आपण आत्मसात करत असतो.. त्यामुळेच पूज्य बाबा बेलसरे सुद्धा म्हणायचे श्री गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र हेच सर्वात महत्वाचे अनुकरणीय आहे . त्यात महाराज जसे वागले तसेच आपण वागगायचा थोडा जरी प्रयत्न केला तरी आपले निम्मे काम झाले.
प्रभू श्री
रामचा "एक बाणी" हा सद्गुण म्हणजे
एका बाणात प्रभू राम शत्रूचा नायनाट करतो असा घ्यायचा नाही . प्रभू रामाने एकदा एक
दिशा ठरवली, एक निश्चय केला , एक ध्येय निश्चित केले की ते प्राप्त होई पर्यंत त्याचा
मन विचलित होत नाही. अढळ आणि दृढ निश्चय हे दोन गुण आपण आत्मसात करावे असे समर्थांना
इथे अभिप्रेत आहे. . एक गोष्ट साधण्यासाठी जें करावयाचें तेंच नेमके आणि योग्य रीतीनें
केलें जातें हा गुण एकबाणी या विशेषणांतून सुचविला जातो. PERFECTIONST म्हणजे
"एक बाणी" श्रीराम . श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे
सदैव पालन केले. त्याने एकदा माता कैकयीला आणि पिता दशरथ यांना वाचन दिले की १४ वर्षे
वनवास भोगेन . त्यामुळे भरताने कितीही समजावले तरी राम त्याच्या दिलेल्या वाचनाला जागला
आणि ते शेवट पर्यंत निभावून नेले. .श्रीराम एकपत्नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात
तत्पर आदर्श राजा होता. बहुपत्नीत्वाची प्रथा असूनदेखील (प्रत्यक्ष पित्याच्याच तीन
भार्या होत्या) त्याने एकपत्नीव्रत संभाळले. वनवासात असताना शूर्पणखा सौंदर्यवतीचे
रूप घेऊन समोर आली आणि प्रेमयाचना करू लागली तरी श्रीरामाचे मन विचलित झाले नाही. आणि सीतेचा दीर्घकाळ वियोग झाला असतानाही त्याने आपले
मन ढळू दिले नाही. सीतेशी तो सदैव एकनिष्ठ राहिला. पण नंतर प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्त
केल्यावर त्याने आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा
त्याग केला.
या शिवाय श्री
रामाची कुटुंबवत्सलता, रामाची सत्यनिष्ठा, रामाचा सत्यवचनी म्हणून असलेला लौकिक, त्याचे
शुद्ध आचरण, प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याची त्याची हातोटी, केवढ्याही मोठ्या
संकटाला सामोरे जाण्याची त्याची तत्पर वीरवृत्ती, त्याचा त्याग असे कितीतरी गुण आपण
आत्मसात करावे असे आहेत. राम उध्दार मात्र सर्व लोकांचा करतो, लंकेचे राज्य जिंकले
पण ते स्वत:साठी न ठेवता सद्वर्तनी विभीषणाच्या हवाली केले कारण विभीषणाच्या कुशल आणि
कार्यक्षम राज्यकारभारामुळे लंकेची जनता सुखी होईल म्हणून. अयोध्येतील प्रजेला देखील त्याने सुखी, समाधानी ठेवले म्हणून तर त्याचे
राज्य आदर्श ठरले. आजही आपण ‘अच्छे दिन’ येतील तेव्हा रामराज्य येईल असे म्हणतोच ना? तर अशा या श्रीरामाचे विचार, त्याचा विवेक, त्याची
न्यायी वृत्ती आपण आदर्श, अनुकरणीय मानली पाहिजे. प्रभू राम
चंद्राच्या चरित्रात प्रत्येक प्रसंगी त्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत विवेक बुद्धीने
(BALANCED MIND) आणि
सारा सार विचार करून घेतलेले आहेत . विश्वामित्रांच्या यज्ञरक्षणापासून ते सीतात्यागापर्यंत
सर्व घटनांचा सूक्ष्म दृष्टीनें विचार केला म्हणजे रामचंद्रांच्या कृतीमागची दिव्य
उदात्तता जाणवल्यावांचून राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात-जानकीनायकाचा, भगवान रामचंद्राचा
आश्रय करा, तुमच्या भजनाचा, स्मरणाचा, चिंतनाचा विषय तोच एक असूं दे. त्याचे अखंड स्मरण
चाटतात ठेवल्याने आपोआप त्याचे गुण आपल्यात येतील. क्रिया पाहता म्हणजे त्याचं वागणं बघून आपला उद्धार होईल, थोडक्यात त्याच्या चरित्र अभ्यासाने आपला उद्धार होईल. या अभ्यासातून काय करावं तर त्या रामाचा विवेक, त्याच्या वागण्यातला विवेक कायम धरून ठेवावा, म्हणजेच...केवळ चरित्र अभ्यास, त्याचं वाचन, गायन इतक्यात पुरतं साधकाचं शिष्यत्व किंवा भक्ताचं भक्तेपण स्तिमित रहात नाही तर...विचारांच अभिशोषण ,कृतीच अनुकरण ही साधकाची जबाबदारी असते त्याचीही जाणीव रामदास स्वामी करून दिल्याशिवाय रहात नाहीत

