न ये राम वाणी तया थोर हाणी । जनीं वेर्थ प्राणी तया नाम काणी ॥हरीनाम हें वेदशास्त्री पुराणी । बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥
नाम घेतांना मनात विचार येतात आणि नामाबद्दल प्रेम येत नाही हे एकवेळ समजू शकतो पण नुसते वैखरीने (तोंडाने पुटपुटणे) नाम घेणे सुद्धा जमत नसेल तर आपले जीवनच व्यर्थ आहे. आपण स्वतःच्या आयुष्याची किती हानी करून घेतो आहे याची कल्पनाही करता येणार नाही. स्वतःला सुधारण्याचे सर्व मार्ग आपण आपल्या हाताने बंद करून टाकल्यासारखे हें आहे. स्वतः च्या पायावर धोंडा पडून घेतल्या प्रमाणे आहे. आदराने रामनाम घेत नसेल तर त्यात रामाचे, परमेश्वराचे काही नुकसान होत नाही तर आपण स्वतः रामनामजपामध्ये मिळणाऱ्या स्वर्गीय आनंदाला मुकतो आहोत. अंतिम मोक्षप्राप्तीला सुद्धा मुकतो म्हणजे मग यात नुकसान कोणाचे होते? म्हणजे आपल्या सारखे करंटे आपणच कारण शेवटी अपार हानी आपलीच होते. रामाची नाही. भले देहांतानंतर मनुष्याचे सगेसोयरे त्याचे कलेवर घेऊन जाताना “रामनाम सत्य है” असा घोष करत चाललेले असले तरी त्याचा उपयोग त्या माणसाला होतो का? अर्थातच नाही कारण तेव्हा ना तो स्वत: हे नाम घेऊ शकतो ना ऐकू शकतो. हे आपण सगळे बघतो आहोत तरी जिवंत पाणी नाम का घेत नाही याची खंत समर्थ वारंवार बोलून दाखवत आहेत.
आपल्या आई वडिलांनी ठेवलेल्या या देहाच्या नामा बद्दल आपल्याला किती आत्मीयता वाटते, आपल्याइतकंच नश्वर असलेलं आणि मला दुसऱ्या कुणी तरी ठेवलेलं हे “नाव” त्याचा जप न करताही मला किती आपलंसं वाटतं! ते टिकावं म्हणूनच आपण किती धडपड करतो. हे “नाम” टिकावं म्हणजे माझा नावलौकिक टिकावा, अशीच माझी सुप्त इच्छा असते. परमात्म्याच्या दिव्य नावाऐवजी आपण स्वत:च्या क्षुद्र अशा नावलौकिकातच अडकतो . ज्याने आपल्याला या भूतलावर पाठवले त्याचे नाव घेणे आपण का विसरतो? ते का पळायला परकं वाटतं? आपल्या स्वतः च्या नावाचा जय घोष सगळ्यांनी करावा, आपल्या नावाला काळिमा लागू नये म्हणून आयुष्य भर धडपडत असतो पण भगवंताची स्तुती करून त्याला आनंद होईल म्हणून आपण नाम का घेत नाही? सगळ्या संतांनी आपल्या अभंगांमध्ये म्हटलं आहे की, हात जर त्या भगवंताच्या सेवेत आणि पूजेत रत नसतील तर ते व्यर्थ आहेत. पाय जर त्या सद्गुरूस्थानी जात नसतील, तर ते व्यर्थ आहेत. डोळे जर त्याच्या दर्शनासाठी आतुर नसतील तर त्यांच्यात आणि काचगोळ्यात काहीच फरक नाही. कान जर त्यांचा बोध ऐकायला उत्सुक नसतील तर ते निव्वळ छिद्रवत आहेत. मुख जर त्यांचं नाम घेत नसेल तर ते असूनही काही उपयोग नाही. तेव्हा सत्संगात असूनही जर परम तत्त्वांची गोडी नसेल, तर तो माणूस नव्हेच, तो तर एखाद्या श्वापदासारखाच आहे. थोडक्यात नाम उच्चारीत नाहीं, त्यामुळे आपले जीवन व्यर्थ आहे, आयुष्य फुकट चालले आहे असे वाटायला पाहिजे असे समर्थ या श्लोकात सांगत आहेत. केवळ श्वासोच्छ्वास करतो म्हणून आपण प्राणी आहोत का ? लोहाराचा भाताहि श्वासोच्छ्वास करतो, तो प्राणी नाही, पण उपयुक्त असतो. तेवढाहि उपयोग आपण आपल्या नर जन्माचा करून घेतला नाही याचे समर्थांना खूप दुःख होत आहे. नामाचा उच्चार न करणाऱ्या माणसाला प्राणी म्हणण्याऐवजी काणी म्हटलें पाहिजे. काणी म्हणजे विशिष्ट रोगानें आंतून काळा पडलेला जोंधळा. वरून दाणा सामान्यतः जोंधळ्यासारखाच दिसतो. पण आतले पीठ जंतुसंसर्गाने विषारी होऊन काळे पडलेले दिसते. तें अपायकारकहि असतें. आपण जर नाम घेत नसू तर आपले स्वरूप अशा काणी जोंधळ्यासारखे असतें असें समर्थ म्हणतात.
पुढे समर्थ सांगतात माझ्या सांगण्यावर विश्वास नसेल तर निदान महर्षी व्यास यांच्या शब्दावर भरोसा का ठेवत नाही ? वेद , पुराणे, गीता अशा अनेक ग्रंथांतून नामाचे महत्व सांगितले आहे म्हणून तरी नाम घ्या . "एष मे सर्व धर्माणां धर्मोऽधिकतमो मतः । " असें वेदव्यास विष्णूसहस्रनामाच्या प्रस्तावनेत भीष्ममुखानें म्हणतात. अशा स्थितींत जें सहज करणें शक्य आहे तें नामोच्चारण तरी अवश्य करावें. भारतीय संस्कृति अध्यात्म प्रधान आहे. यामध्ये भगवंताचे दर्शन हेच मानवी जन्माचे परमोच्या ध्येय मानले जाते. यासाठी आपल्या ग्रंथांमध्ये हे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले गेले आहे. नरदेहा सारखे घबाड मिळून देखील जीवाला भगवंताच्या नामात रमता आले नाही तर तो अनेक जन्म घेउन देखील दरिद्रीच रहात, या चरणांत असलेला व्यासांचा उल्लेख फार अर्थगर्भ आहे. व्यासांनी वेदांचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार भाग केले. अठरा पुराणं, ब्रह्मसूत्रं, मीमांसा, महाभारत आदी महाग्रंथ लिहिले. पण त्यांच्या मनाची पूर्ण तृप्ती काही झाली नव्हती. देवर्षी नारद यांनी त्यांच्यावर कृपा केली आणि बोध केला की, एका हरीच्या गुणवर्णनाशिवाय खरं समाधान लाभूच शकत नाही. त्यानंतर व्यासांकडून “श्रीमद्भगवत महापुराण” साकारलं आणि ती तृप्ती त्यांना लाभली. त्यामुळे त्या हरीच्या नामाचा प्रभाव व्यासांनीही गायला. ज्ञानाचे भांडार अशा व्यासांनीही जे नाम गायले, ते नाम हे सामान्य साधका तू का टाळतोस, असंच समर्थ विचारीत आहेत.
