मुखी राम त्या काम बाधू शकेना ।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ॥
हरीभक्त तो शक्त कामास भारी ।
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥
श्लोकाचा अर्थ समजून घेण्याआधी “काम” आणि “ब्रह्मचारी” या दोन शब्दांचा अर्थ समजून घेऊ-
काम : कोणतीही गोष्ट हवी असे वाटणे म्हणजे काम. ती गोष्ट म्हणजे घर , सत्ता ,नौकरी , संपत्ती किंवा स्री पासून मिळणारे शरीरसुख अशा सगळ्या गोष्टी कामची वासना या मध्ये येतात. स्त्री पासून मिळणारे सुख नेहेमीच त्याज्य नसते. शरीरसुख आणि कामवासने मध्ये सुद्धा धर्माच्या चौकटीत राहून काम उपभोगणे आणि अधर्माने काम वासना तृप्त करणे अशीं दोन रूपें आहेत. गीतेच्या सातव्या अध्यायामध्ये धर्माच्या मर्यादेत राहणाऱ्या कामाला भगवंताचे स्वरूप मानलें आहे, तर अधर्म्य कामाला 'महाशन', 'महापाप्मा' अशी विशेषणें देऊन गीतेने तिसऱ्या अध्यायांत त्याला मनुष्यजातीचा वैरी म्हणून संबोधिले आहे. सोळाव्या अध्यायात त्याला नरकाचे दार म्हटलें आहे. त्यामुळे धर्माच्या चौकटीत राहून शरीर सुख उपभोगणे त्याज्य नाही. ब्रह्मचारी : म्हणजे जो सदैव ब्रह्माचे चिंतन करत असतो असं मनुष्य आणि त्यामुळे त्याचा मध्ये कोणत्याच वासना उत्पन्न होत नाहीत. शरीर सुखाची वासना ही इतर वासनांपैकी एक असल्यामुळे त्याला विवाह करायची गरज वाटत नाही . फक्त विवाह न करता राहणारा मनुष्य म्हणजे ब्रह्मचारी असा रूढ अर्थ चुकीचा आहे. गरज( NEEDS) आणि चैन (WANTS) या दोन गोष्टी वेगळ्या आहेत . गरजे पुरती कोणतीही कामना असणे वाईट नाही आणि ती बाधत सुद्धा नाही . पण चैन करण्यासाठी कोणतीही गोष्ट लागत असेल तर त्याने आपल्यामध्ये वासना निर्माण होते. मनात जास्त वासना निर्माण झाली की गरजे पेक्षा जास्त वस्तू मिळाव्या असे वाटते आणि ते हेच समर्थांनी इथे अभिप्रेत आहे . मुखात राम नाम असेल तर चैन म्हणून आपल्या कडे भरपूर गोष्टी असाव्या अशी वासनाच निर्माण होत नाही. ही जादू रामनामाने प्राप्त होते . ‘‘मुखी राम त्या काम बाधू शकेना!’’
आता ‘मुखी राम’ म्हणजे नुसतं वैखरीने रामनाम घेणं नाही. ज्या ज्या मार्गानी बाहेरचं दृश्य जग मी आत घेतो, त्या जगाचे संस्कार ग्रहण करतो ते सारे मार्ग “मुख” च आहेत! म्हणजे ज्या डोळ्यांनी दृश्यरूप आपण ग्रहण करतो, ज्या कानांनी आपण जगाचं श्राव्यरूप ग्रहण करतो, ज्या बुद्धीनं आपण जगाचा बोध होतो.. हे सारे ‘बाहेरून आत’ जाणारे मार्ग म्हणजे ‘मुख’च आहेत. तेव्हा ज्याच्या मुखी राम आहे, म्हणजेच ज्या ज्या इंद्रियांद्वारे आपण जगाशी संलग्न होतो त्या त्या इंद्रियद्वारांशी त्या सद्गुरूचीच जाणीव स्थापित असेल तर आपल्याला गरजे पेक्षा जास्त वस्तू असाव्या अशी कामना होत नाही आणि त्यामुळे त्या सर्व गोष्टी बाधत नाहीत आपल्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची शक्ती. आपल्या मनात दिवसाला सरासरी 70000 विचार येतात. विचार सुद्धा ऊर्जा रुपातच उत्सर्जित होत असतात. त्यांचा ही प्रभाव आपल्या आजूबाजूच्या लोकांवर आपल्या वृत्तीवर पडत असतो. सकारात्मक विचारांमुळे आपले तेजोवलय नेहमी स्ट्रॉंग रहाते. जर आपण सतत निराशेच्या , द्वेषाच्या किंवा रागाच्या विचारात राहात असू तर आपल्या तेजोवलायवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. आपले विचार आपल्या भावनांना जन्म देतात आणि त्यानुसार तेजोवलय बदलत राहाते. ही गोष्ट विज्ञानाने सुद्धा मान्य केली आहे.
समर्थ नेहमी सांगतात मुखाने रामनामाचा जप करा. पण इथे लक्षात घेतले पाहिजे की त्यांना अभिप्रेत असलेला हा जप केवळ वरवरचा, तोंडाने केलेला जप नव्हे. जप हा भक्तिपूर्वक, मनापासून, हृदयातून आलेला असायला हवा खुप मनापासून आणि आतून नाम घेत गेलो तर आजूबाजूच्या जगाची संवेदना लटकी पडू लागते. मग आत भरलेल्या जगाची म्हणजे आपल्यामधील भगवंताची कल्पना येते.नामस्मरणाने आतील जगाचा लोप झाला की देह स्वभाव पालटतो. जीवनात एक ईश्वरकेंद्रित नवीन लय निर्माण होते. त्यामुळे जीवनाकडे समग्रपणे पाहण्याची कला साध्य होते. सामान्य माणूस नाम घेतल्यानंतर सद्गुरूंना न आवडणा-या व नामाला बाधणा-या गोष्टी करतो, त्यांचा परिणाम धुवून काढण्यास अखेर नामच उपयोगी पडते. नाम घेणारा एकदा का ईश्वरकेंद्रित झाला की मग भगवंताकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करावाच लागत नाही आणि त्यामुळे गरजे पुरत्याच गोष्टी असाव्या असे आपोआप वाटू लागते. प्रापंचिक लोक विषय सुखात मग्न असतात आणि नाम घेणाऱ्या मनुष्याला आपल्या भगवंत प्राप्तीच्या ध्येयाकडे जाण्यासाठी धैर्याने निंदेला तोंड द्यावे लागते. साधकाने विषय सुखाच्या मोहाला बळी न पडणेंच चांगलें. सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यास धैर्याने उभे राहावे, असे धारिष्ट्य नामधारकास लाभते हेंच नामाचे खरें सामर्थ्य. साधकाला आपली प्रतिकूलता नष्ट व्हावी म्हणजे सुख लाभेल असें वाटणे चुकीचे आहे. साधकाने परिस्थितीवर मात करावी आणि तिच्याशी झगडून नाम घेत राहणे हाच पुरुषार्थ आहे. परंतु त्यासाठी धारिष्ट्य लागतें. तें नामावरचा विश्वासानें नामधारकास प्राप्त होते. जो हरिभक्त आहे, नामधारक आहे, आळस न करतां भावानें नामस्मरण करणारा आहे, तो शक्त म्हणजे समर्थ होतो, शक्तिशाली होतो आणि त्याला सर्व विकारांचे आणि आपत्तींचे मूळकारण असलेल्या 'कामास' जिंकण्याचें बळ लाभते. विषयोपभोगाची अतिरिक्त वासना निर्माण होत नाही. म्हणूनच हरीचा म्हणजे रामाचा भक्त ब्रम्हचारी मारुती हा जगात धन्य झाला आहे.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
