जेणें मक्षिका भक्षिली जाणिवेची।तया भोजनाची रुची प्राप्त कैंची।अहंभाव ज्या मानसीचा विरेना। तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।।
माशी पोटांत गेली कीं मळमळतें. पोटांत ढवळतें, उलट्या होतात. कितीहि पंच पक्वान्नाचे रुचकर अन्न पानांत असले तरी माशी पोटात गेलेल्या स्थितींत त्याचे पचन होत नाही ढवळते, त्याची रुचीहि लागत नाही, स्वाद कळत नाहीं, खावे, जेवावे, अशी वासना राहत नाहीं. खाल्लेले सुग्रास अन्न वमनक्रियेने बाहेर पडते; एकदम चपखल आणि कोणालाही समजेल अशी उपमा इथे श्रीरामदासांनी येथे दिली आहे. म्हंणूनच एखादे काम व्हावयाचे नसले, म्हणजे ‘माशी शिंकली’ असे आपण म्हणतो. आपण कोणीतरी मोठे आहोत याची जाणीव, अहंकार, मीपणा हें सगळे विकार माशीसारखे आहेत. साधक कितीही ज्ञानी झाला आणि अनेक ग्रंथ आणि सगळ्या वेदांचे वाचन मनन केले त्याचा फायदा होणार नाही पर्यंत त्याचा मनातील अहंकार आणि मीपणा कमी होणार नाही.
ज्ञान घेता घेता माणसाला अहंकार झाला, म्हणजे तेथे अहंकाराची माशी शिंकल्यासारखीच झाली आणि तो अहंकार असल्यामुळे, पोटातच असल्यामुळे, तिथली माशी फार काळ जिवंत राहू शकणार नाही. जोपर्यंत आपला अहंकार गळून पडत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञानरुपी अन्न जबरदस्तीने घेऊनही पचत नाही. कारण त्या अहंकारापोटी त्या अन्नाची चवच गेलेली असते.आणि सगळे ज्ञान संपादन केलेले वाया जाते दृश्य विश्वाचा अनुभव आपल्याला पंचेंद्रियांमुळे होत असतो मात्र परमात्मस्वरूपाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याला अतींद्रिय ची गरज लागते . सर्वसामान्य लोकांना इंद्रियगोचर दृश्याचा अनुभव मिळत असतो पण साधुसंताना अतींद्रिय अनुभव येत असतो. इंद्रियाना दिसणारे दृश्य कालांतराने नाश पावते, पण दृश्याला आंतबाहेर व्यापून असणारे परमात्मस्वरूप हे अबाधित जसेच्या तसेच असते. हे आत्मस्वरूप अतींद्रिय असून प्रत्यक्ष डोळ्यांनी ते कधीच पाहता येणे शक्य नसते. पण त्यासाठी अहंकाराची माशी असेल तर अतींद्रिय ACTIVATE होऊच शकत नाहीत . संपूर्ण शरणागती आणि अनन्य भक्ती असेल तरच ही अतींद्रिय ACTIVATE होतात. आणि भक्ती आणि शरणागती करण्यासाठी अहंकार हाच मोठा अडसर असतो. जशी पोटात माशी तसाच हा अहंकार. शरणागतीचा दुसरा अर्थ म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक क्रिया थांबविणे. क्रिया न करणे हे कृती करण्यापेक्षा केव्हाही जास्त सोपे आहे; म्हणजेच शरणागती ही सहज साध्य वाटली पाहिजे. पण अनुभव तसा येत नाही. जी गोष्ट अत्यंत सोपी वाटते ती करायला पुष्कळदा कठीण जाते असा अनुभव येतो. एखाद्याला मोटार वेगात चालव म्हटले तर तो ते सहज करील, पण अती हळू चालव म्हटले तर ते फार कठीण असते. गीतेत भगवंतांनी अर्जुनाला 'तू नुसता मला शरण ये' असे सांगितले आहे. देहबुद्धी गेल्याशिवाय शरणागती येत नाही. देहबुद्धी, वासना, अहंकार, ही सर्व एकच आहेत. जगातल्या वैभवाची आसक्ती आणि परमात्मप्राप्ती, या दोन्ही गोष्टी एकत्र असूच शकत नाहीत. भगवत्प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही, आणि शरणागती म्हणजे, 'मी कर्ता ' हा अभिमान नाहीसा होऊन, 'सर्व कर्तृत्व परमेश्वराचे आहे' ही दृढ भावना होणे. नामाशिवाय इतर साधनांत 'कृती' आहे; म्हणजे 'मी कर्ता ' या अहंकाराला वाव आहे. स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही, म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही. भगवंताची प्राप्ति व्हायला दुसरे काही नको, शरणागती पाहिजे. मी उपाधिरहित बनणे ही शरणागती आहे. माझेपणाची जी उपाधी आहे ती नाहीशी करायची असेल तर साधन तसेच पाहिजे. इतके उपाधीरहित साधन नामाशिवाय दुसरे कोणतेही नाही.
पोटातील माशीने झालेले FOOD INFECTION काढायला ANTI-BIOTICS डॉक्टर देतात तसे अभिमानाचे इन्फेकशन काढून टाकायला नामरूपी ANTIBIOTIC घेणे जरुरी आहे
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

