धुरू लेकरूं बापुडे दैन्यवाणें ।
कृपा भाकिता दीधली भेटि जेणें ॥
चिरंजीव तारांगणीं प्रेमखाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७
॥
सूर्यवंशामध्ये उत्तानपाद नांवाचा राजा होऊन गेला.
ध्रुव हा त्याचा पुत्र. त्याच्या आईचे नांव सुनीति. हा मोठ्या प्रेमाने आपल्या वडिलांच्या
मांडीवर बसला असतांना त्याच्या सावत्र आईने, सुरुचीने राजाच्या लाडक्या राणीने, त्याला
उत्तानपादाच्या मांडीवरून मत्सराने खालीं ओढले, आणि लाथ मारून हाकलून दिलें. लाडक्या
बायकोच्या मुठीत गेलेला बाप कांहीं बोलू शकला नाहीं. ही अगतिकता ध्रुवाला फार बोचली.
त्याची आई सुनीति त्याला म्हणाली- बाळ, असा शोक करूं नकोस. भगवंताला आपलासा कर. तो
अनाथांचा नाथ आहे. पांच वर्षाचा ध्रुव आईला नमस्कार करून घराबाहेर पडला. महर्षि नारदांच्या
उपदेशाप्रमाणे त्यानें श्रीनारायणाची आराधना केली. त्यांच्या निष्ठेने भगवान् प्रसन्न
झाले. शामसुंदर चतुर्भुज असा रूपांत त्याच्यापुढे प्रकट झाले. ध्यानासाठी डोळे मिटलेले
असतांनाहि परमात्म्याचे आल्हाददायक, शीतल तेज ध्रुवाला जाणवले. ध्याननिमग्न ध्रुवाने
चकित होऊन आपले नेत्र उघडले आणि पाहिले तो त्या सगुणरूपाचे स्मित हास्य ध्रुवावर प्रसन्नतेचा
अमृतवर्षाव करीत होतें. ध्रुवानें हात जोडले, मस्तक नमविले, पाय धरले, पण किती वेळ
गेला तरी काय बोलावे तें त्याला सुचेना. तेव्हां श्रीनारायणाने आपल्या दिव्य शंखाचा
स्पर्श ध्रुवाच्या गालाला केला, आणि ध्रुवाच्या जिभेवर जणू प्रेमभक्तीने न्हालेली सरस्वती
प्रगट झाली.
वरील गोष्ट लहानपणी ऐकली होती. समर्थांनी ध्रुव
बाळाची गोष्ट इथे का सांगितली ? त्यांना काय सूचित कराचे असेल ? आता साधकाने कोणता
अर्थ घ्यावा ? उत्तानपाद हा शब्द उत्तान आणि
पाद या दोन शब्दांपासून बनला आहे. उत्तान म्हणजे अस्थिर (UNSTABLE )आणि पाद म्हणजे
पाय. ज्याचे पाय स्थिर नाहीत असा उत्तानपाद राजा. अस्थिर पाय म्हणजे एका ठिकाणी मन रमत नाही . म्हणजेच मन भटकत असते.
सुनीती शब्द सु आणि नीती या दोन शब्दांपासून बनला आहे. सु म्हणजे चांगले, नीती म्हणजे
सद्प्रवृत्ती, सदाचरण, विवेक, सत्य असा व्यापक अर्थ नीतीचा होतो. जो समर्थांनी मागच्या
११५ श्लोकात सारखा सांगितला आहे . व्यावहारिक
नियमांना नीती म्हणतात. साधकाने नीतीने वागणे हे समर्थांना इथे सुचवायचे आहे का ? सदाचार
आणि विवेक बुद्धी वापरून आचरण करणे हा आपला धर्म असायला पाहिजे नाही का? या सुनीतीचा
मुलगा ध्रुव जो आता अढळस्थानी आहे. सुरुची, सु आणि रुची या दोन शब्दांपासून बनलेला
आहे. स्वत:ला जे आवडते, योग्य वाटते ती रुची. रुची चे सारखे आकर्षण असते म्हणून सारखे
खावे , बघवे, बोलवावे असे वाटते. म्हणजे मन बहिर्मुख असते आणि इंद्रिय सुख हवेसे वाटत
असते . रुची ही मात्र वैयक्तिक असते आणि प्रत्येकाला वाटते आपली आवड उत्तम आहे . म्हणून
तिचा मुलगा उत्तम. सुनीती आणि सुरुची हे दोन्ही उत्तानपाद राजाचे दोन अस्थिर पाय झाले.
अस्थिर पाय हे अस्थिर मनाचे द्योतक आहे. उत्तानपाद राजा आपल्या सर्वामध्ये दडलेला आहे.
आपल्या मनात नेहमी नीती आणि रुची या दोन्ही वास करून असतात. पण प्रत्येक वेळेस दोघींचे
पटत नाही . बहुतांश वेळी रुची नीतीवर मात करते, पण आपण नीतीप्रमाणे योग्य वागायला हवे.
ध्रुवबाळ एका पायावर उभा राहिला म्हणजेच त्याने आपले मन स्थिर केले आणि आपल्या रुचीला
लगाम घातला. म्हणजे मन अंतर्मुख केले . ज्या पायावर उभा राहिला तो सुनीतीचा होता, तो
सुनीतीचा मुलगा होता. त्याने आपली नीतिमत्ता जागरूक ठेवली. त्याची विवेक बुद्धी जागरूक
होती त्यामुळे त्याने रुचीवर विजय मिळवला . आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला . दुसरे
अगदी आपल्या बाबतीत होणारे उदाहरण बघू या. आपल्यापैकी बहुतेकांना जीवनशैलीत घडलेल्या
बदलांमुळे कोणतातरी आजार कधी कधी होतो. आपल्याला माहीत असतात त्याची कारणे. म्हणजे
बाहेरचे तेलकट खाणे , जास्त चहा किंवा कॉफी पिणे आणि व्यायाम न करणे. आपण आपले भले कशात आहे हे माहिती असून आपली विवेक बुद्धी आपण
गहाण ठेऊन देतो . आपण नीतीने वागायचे सोडून
देतो आणि रुचीचे ऐकतो आणि जीवन शैलीत बदल करत नाही. माझे (सुनीती) एक मन सांगत असते.
ते मला आहाराच्या नियमांची आठवण करून देत असते. तर दुसरे मन (सुरुची )म्हणते, तुला
आवडतंय ना मग खा की. कुणाला भितोस, अजून दोन दिवस गोळ्या खा, त्यात काय एवढे. परत पहिले
मन म्हणते, अरे अशासारख्या गोळ्या घेणे बरोबर नाही. पुढे जाऊन अजून त्रास होईल. मग
दुसरे मन म्हणते खा खा जरा आवडीचे पदार्थ खाल्ले तर कुठे बिघडले ? त्यामुळे
आपण त्याच्यावर यथेच्छ ताव मारतो. औषधे पुढची चार दिवस घेतो. म्हणजेच आपल्या
स्वत:च्या बाबतीतही आपले सुरुचीवाले मन बऱ्याच वेळा बाजी मारते.
प्रपंचातले खाण्या पिण्यावरचे एक उदाहरण दिले तेच परमार्थात सुद्धा आपण अमलात आणले तर ध्रुव बाळासारखाच आपल्याला सुद्धा भगवंत प्रसन्न होईल यात शंका नाही असे समर्थांना इथे अभिप्रेत असावे
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

