फुकाचे
मुखी बोलता काय वेचे ।
दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४
॥
“लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण” ही म्हण मराठीत प्रचलित आहे . स्वतः थोडी पुस्तके वाचली, इंटरनेट वर माहिती मिळवली आणि वक्तृव आत्मसात केले की त्या जोरावर लोकांना आकर्षक वाटेल असें बोलणेंहि सोपे जाते त्या साठी फार काही कष्ट घ्यायची जरूर नसते . “गूगल” मुळे सहज संदर्भकोश, विषयवारीनें संग्रहित सुभाषिते, संतांच्या वचनांचे संग्रह, कोणालाहि सहज उपलब्ध होऊ शकतात . त्यामुळे त्यांच्या सहाय्याने, त्यामानानें अगदीं थोडे श्रम करून लिहिणे आणि बोलणे सोपे जाते. पण हें सर्व बोलणे किंवा लिहिणे फुकट जाऊ शकते. नुसते बोलायला किंवा लिहियला काहीही
कष्ट आणि ज्ञान लागत नाही असे समर्थ इथे म्हणतात ? सामान्यजन आकृष्ट होतात, वाहवा मिळते, लौकिक वाढतो आणि त्यापलीकडे याचा उपयोग नाही. देहबुद्धी ते आत्मबुद्धी या पारमार्थिक प्रवासात पदरात कांहींच पडत नाहीं, त्या लिहिण्याने नाम साधना जास्त होते का ? त्यात जे लिहिले आहे त्याचे आचरण होते का हे स्वतः तपासून बघणे जास्त महत्वाचे आहे. लोकांची वाहवा मिळत असेल तर त्याने स्वतःची हानिच होते. कारण थोडी वाहवा मिळू लागली, मानमान्यता वाढली कीं माणसाचा अहंकार पुष्ट होऊं लागतो आणि मग या अहंकाराची भूक वाढत जाते. दुसऱ्याला आपल्या सारखे बोलता किंवा लिहिता येत नाही , त्याला परमाथिक आवड नाही असा दिवसादिवसांनीं, क्रमाक्रमानें, हा अहंकार वाढत जातो . त्यातून पैसा, उपभोग, कीर्ति याच्यामागे अधिकाधिक प्रमाणांत असा मनुष्य लागतो. सरळपणा, साधेपणा, सौजन्य यांचा लोप होतो आणि साधनात व्यत्यय येतो, म्हणून समर्थ म्हणतात- 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.' ज्या सांगण्या बोलण्याचा प्रत्यक्ष आचरणांशी कांहीं संबंध नाही, असें बोलणें नुसती वाचाळता आहे. व्यर्थ बडबड आहे,
वर्तमान पत्रात किंवा मासिकात मारे लिहायचे अहंकार कमी करा, क्रोधावर विजय मिळवा आणि प्रत्यक्षात आपणच स्वतः तपासून बघायला हवे की आपण जे बोलते किंवा लिहितो त्या प्रमाणे वागणूक करतो का ? तोंडाची वाफ दवडण्यामुळे काही साध्य होत नाही. अर्थहीन, केवळ बोलायचे म्हणून बोललेले बोल आणि कृती न करता केलेल्या वल्गना या दोन्ही गोष्टी कुचकामाच्या असतात. पाठांतर करून काहीतरी ग्रंथांच्या आधाराने बोलले तर त्यानें संसारातील गुंतागुंत सुटण्यात सहाय्य होत नाही. पोथीला नुसताच स्पर्श केला किंवा मनोभावे डोके ठेवून नमस्कार केले तर लगेच आत्मज्ञान होणार आहे का ? तसेंच कर्म, भक्ति, ज्ञान, योग, या विषयांवर व्याख्यान-प्रवचनांच्या माध्यमातून कितीहि प्रभावी पणे विचार मांडले आणि अनेक ठिकाणी सहस्त्रावधि श्रोत्यांना ३ - ३ तासपर्यंत वेळेचा विसर पाडून रंगवून, खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य जरी वाणीला असले आणि त्याचाच अहंकारच भरून राहिला असेल
तर हें सर्व गुण असून नसल्यासारखे आहे. अशा वक्त्याने स्वतः आपण किती विनम्र आहोत , आपल्याला या ज्ञानाचा उपयोग साधनेला होतो आहे का हे स्वतः तपासून बघावे असे समर्थ इथे सुचवत आहेत
.आपण तसें आहो कीं नाहीं हें ज्याचें त्याला नक्की कळतें. इतरांचे अभिप्राय दोन्हीं दृष्टीनें फसवे असूं शकतात. दुसऱ्यांना केलेली निंदा किंवा स्तुति वरवर ची असू शकते. स्तुतीच्या मुळे आपला दंभ वा अहंकार वाढत जाऊ शकतो. म्हणून मी कसा आहे तें माझें मलाच ठरविलें पाहिजे. “आधी केले मग सांगितले”
असे करणाऱ्या माणसाइतकाच मान “बोले तैसा चाले”
अशा माणसालाहि दिला जाईल, त्याची पावले वंदिली जातील. तेव्हा समर्थ म्हणतात, “हे मना, तू स्वत:लाच विचार यात तथ्य, सत्य आहे की नाही ते म्हणजे तुझे समाधान होईल.”
फुकटची, बाष्फळ बडबड करण्यात कुणाचे काय जाते? आणि
त्यात दिवसेंदिवस वाढत जाणारा अहंकार ! काही सत्कार्य न करता केवळ वाचाळपणा करणे काही
कामाचे नाही हे समजायला पाहिजे असेल तर हे मना तूच त्याचा विचारपूर्वक शोध घे.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
