बहू शास्त्र धुंडाळितां वाड आहे ।
जया निश्चयो येक तो ही न साहे ॥
मती भांडती शास्त्रबोधें विरोधें ।
गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥
अध्यात्म शास्त्रात अनेक पुस्तके आहेत आणि भागवत प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत . प्रत्येक पुस्तक वाचून त्यातील अर्थ समजून घेणे शक्य नाही आणि त्यामुळे अजून गोंधळ निर्माण होणेच होण्याचा संभव जास्त . आपण किती वाचावे, आणि त्याचा अहंकार मिरवावा का या बद्दल समर्थानी इथे भाष्य केले आहे . ग्रंथ अनंत आहेत आणि रोज एक ग्रंथ वाचून संपवतो म्हटलें तरी माणसाचे आयुष्य पुरणार नाहीं. जेवढें होईल तेवढे वाचले म्हटलें तरी त्यातून पदरांत हे महत्वाचे. परमेश्वर आणि मोक्ष प्राप्तीचे विविध मार्ग आहेत. कर्म, शरीर, जन्ममरण, दुःख, पाप इ. अनिष्ट बंधनातून मुक्त झाल्यामुळे जीवाला प्राप्त होणारी पारमार्थिक कल्याणाची सर्वोत्तम अवस्था म्हणजे मोक्ष. जगातील विविध धर्म व संप्रदाय आपल्या अनुयायांना मोक्ष देण्याचे आश्वासन देत असतात आणि त्यासाठी आपण उपदेशिलेल्या मार्गाचा लोकांनी अवलंब करावा, असा त्यांचा आग्रह असतो. भगवद्गीतेत चार धार्मिक संप्रदायांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला आहे. ते चार संप्रदाय म्हणजे योग, कर्म, ज्ञान व भक्ती हे होत. पण भगवत गीतेतील श्लोकांचा अर्थ लावण्यात सुद्धा विविध मते आहेत. त्यामुळे कितीही वाचले तरी समाधान होणार नाही आणि पूर्ण ज्ञान होणार नाही. हे असे असंख्य मतभेद निरनिराळ्या आग्रही संप्रदायांना जन्म देतात आणि मग नाना प्रकारचे वादविवाद, व त्यांतून हेवेदावे निर्माण होतात. अध्यात्मिक अनुभव एकीकडेच राहतो, उरतो तो अंहकार आणि संघर्ष. भांडणांची रणधुमाळीच सर्वत्र चालू राहते. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर-नामदेव-एकनाथ-तुकाराम आणि समर्थ रामदास हे संत पंचक प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून बसले आहे. ज्ञानेश्वरी, भागवत, नामदेव आणि तुकोबारायांच्या अभांगाच्या गाथा, दासबोध या पाच ग्रंथाना मराठी भाषेचे पाच वेद म्हणून ओळखले जातात. पाचही ग्रंथात फार मोठे वैचारिक साम्य व एकवाक्यता आहे. पाचही संतांनी स्वतः कधीही एकमेकांच्या विरोधात एक अक्षर सुद्धा लिहिले नाही. १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत या ५ संतांचे वारकरी आणि धारकरी किंवा प्रवृत्तीवादी आणि निवृत्तीवादी असे वर्गीकरण कुणीही केलेले नव्हते. परंतु एका व्यक्तीने एक लेख लिहीला व त्यातून समर्थ आणि इतर संत या यामध्ये अनावश्यक मतभेद झाले. 'ज्ञानेश्वर ते तुकाराम' हे वारकरी संत केवळ टाळकुटे होते असा विचार मांडला त्या लेखात होता . वारकरी आणि धारकरी असे दोन गट पडले .वारकर्यांनी समर्थाना मग सकल संत गातेतून वगळले. एवढे विकृत स्वरुप होत गेले की समर्थांची ओवी जर उचारली गेली की काही वारकरी मंडळी टाळ खाली ठेवून कीर्तन बंद पाडीत. स्वत: समर्थनी आपल्या संप्रदायला धारकरी असे म्हंटले नाही. रामदास-तुकाराम भेट ही झाली होती आणि त्यांच्यात वितुष्ट नव्हते. एवढेच नव्हे तर पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात समर्थ रामदासनी स्थापन केलेला मारुती आज ही उभा असून त्याच्या दगडी भिंतीवर "शरण शरण हनुमंता तुज आलो रामदूता" हा तुकाराम महाराजांचा अभंग कोरला आहे. जर त्यावेळी वारकरीमधे समर्थाना मनाचे स्थान नसले असते तर मग तिथे हनुमान मंदिर त्याना बंधाता आले असते का? रामदास व तुकाराम या संतानी एकमेकांचे प्रशंसा करणारे अभंग लिहिले आहेत। समर्थ रामदासानी इतर ही वारकरी संतांचे गुणगान गायले आहे त्यात अगदी आरत्यांचाही समावेश आहे.
संत तुकाराम रचित समर्थ रामदास स्वामींवर अभंग
राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥
समर्थ रामदास स्वामी रचित संत तुकाराम यांच्यावर अभंग
भारत प्रवास करीत असतांना समर्थ पुण्याजवळ आले, तेथे त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. एवढेच नव्हे तर त्यांनी संत ज्ञानदेवांची आरतीही लिहिली. आळंदीतील लोकांकडून समर्थांना संत तुकाराम महराजांची कीर्ती समजली. तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी समर्थ व्याकूळ झाले व तेथून देहूला गेले. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या दर्शनाने त्यांचे अंतःकरण उचंबळून आले. या वेळी समर्थ रामदासांनी संत तुकाराम महाराजांचे वर्णन करणारा अभंग लिहिला -
धन्य तुका वाणी धन्य तुझी वाणी | ऐकता उन्मनी दीप लागे ||
धन्य निःस्पृहता एकविध निष्ठा | श्रुतीभाव स्पष्ट दाखविसी ||
संतोषले चित्त होताची दर्शन | कळो आली खून अवताराची ||
घातलासे घडा नामाचा पी गाढ | प्रेमे केला वेद पांडुरंग ||
नवविधा भक्ती रूढविली जगी | तारू कलियुगी दास म्हणे ||
थोडक्यात एकाच गांवाला जाण्याचे अनेक मार्ग असूं शकतात. हे या संतांनी दाखवून दिले आहे. अनेक दिशांनी वाहणारे प्रवाह शेवटीं समुद्रालाच मिळतात. हेच या दोन्ही संतांनी अनुभवले आहे. पण त्यांचे भंपक अनुयायी निष्कारण वाद विवाद घालत बसतात. कारण त्यांना केवळ शब्द ज्ञान असते. अनुभव नसतो. त्याचा भर अनुभवावर नसतो. स्वतःपेक्षा वेगळे मत तो अज्ञानाचें लक्षण मानतो. आपल्याला पटते तेंच खरे त्याला विरोध करील तो मूर्ख, या भावनेने लोक वागतात, त्याचा परिणाम द्वेष-मत्सरांत होतो. अनुयायी लोकांना शब्दांच्या पलीकडले असलेल्या ब्रम्हतत्वाचा अनुभव घेताच येत नाही त्यामुळे ते जात-पात , निर्गुण-सगुण,, भक्ती-ज्ञान या पलीकडे विचार करू शकत नाहीत. हे असे असंख्य मतभेद निरनिराळ्या आग्रही संप्रदायांना जन्म देतात आणि मग नाना प्रकारचे वादविवाद, खंडणमंडणाच्या प्रवृत्ति व त्यांतून हेवेदावे निर्माण होतात. अध्यात्मिक अनुभव एकीकडेच राहतो, उरतो तो अंहकार आणि संघर्ष. भांडणांची रणधुमाळीच सर्वत्र चालू राहते . पण असे भंपक अनुयायी यांच्या मधील मतभेद संपतात जेंव्हा सगळ्या संतांनी आपल्या ग्रंथातून सांगितलेल्या ज्ञानाचा खरा बोध होतो तेंव्हा. समर्थांना प्रबोध शब्दाने हेंच स्वतः अनुभवात्मक यथार्थ ज्ञान अभिप्रेत आहे. अनुभवाच्या पातळीवर एकदां मनुष्य जाऊन पोंचला, प्रत्यक्ष वस्तूचा त्याला साक्षात्कार झाला कीं मग असे वितंड वाद आणि तात्विक मतभेद किंवा मार्गभेद त्याला विचलित करूं शकत नाहींत उदाहरणार्थ भूक लागल्यामुळे भात खाऊ इच्छिणारे चार प्रवासी एका स्थानकावर उपाहारगृहाच्या चालकाला आपणास काय पाहिजे तें सांगू लागले. चौघे चार प्रांतांतील होते. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या होत्या. काश्मिरी म्हणाला-तोमूल. महाराष्ट्रीय म्हणाला-भात. पंजाबी म्हणाला-चावल. तामिळी म्हणाला-सोरु. स्थानक होतें कर्नाटकांत. तेथे एक जाणकार व्यक्ती होती तिला चारही भाषा अवगत होत्या . त्यानें वाढप्याला भाताच्या थाळ्या घेऊन येण्यास सांगितलें. भांडण थांबले. सगळे एके ठिकाणीं बसून समाधानाने जेवले. प्रबोधनाने मतभेदाची गति खुंटते ती अशी.
पुढील श्लोक वाचायला इथे क्लिक करावे
https://manobodh-arth.blogspot.com/2020/11/blog-post_23.html
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
