अहो ज्या नरा रामविश्वास नाही ।
तया पामरा बाधिजे सर्व काही ॥
महाराज तो स्वामि कैवल्यदाता ।
वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥
शाळे मध्ये परीक्षेत दोन भिन्न गोष्टी मधील फरक सांगा असा एक
नेहेमी प्रश्न असायचा. या श्लोकात समर्थ बद्ध आणि साधक या दोन भिन्न प्रवृत्तीच्या
लोकांमधील फरक सांगत आहेत. पहिल्या दोन ओवी बद्ध प्रवृत्तीच्या आहेत आणि तिसरी आणि
चौथी साधक प्रवृत्तीबद्दल सांगत आहेत. कसे ते बघू. दारूच्या आहारी गेलेल्या एखादा मनुष्य
व्यसन मुक्ती केंद्रात गेल्यावर तिकडे सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टर रुग्णांना दारू
पासून होणारे दुष्परिणाम सांगतात. वेगवेगळ्या तऱ्हेने समजावून सांगतात आणि त्यांना
त्यातून सोडवण्याचा प्रयत्न करतात. तरी सुद्धा काही रुग्ण ऐकत नाहीत कारण त्यांना आपले
हित कशात आहे हेच समजून घ्यायचे नसते. त्याच प्रमाणे संसारात ज्याला आपले नरजन्माचे
हित समजत नाही त्या लोकांना उद्देशून हा श्लोक लिहिला आहे. अशा लोकांना समर्थ इथे पामर
असे म्हणतात. पामर म्हणजे ज्याची कीव करावी असा. माझ्या मते माणसाला दिलेली
ही सगळ्यांत वाईट शिवी आहे. पुरुषाला नपुंसक म्हणण्यासारखे हें आहे. पामर,म्हणजे मूर्ख,
अविचारी व्यक्ती असा स्पष्ट निर्देश करताहेत. – जो मूर्ख मनुष्य श्रीरामावर विश्वास
ठेवत नाही, रामाचा अधिक्षेप, हेटाळणी करतो. व्यसनी लोकं जसे अविचारीपणा करतात आणि दारू
सोडत नाहीत, डॉक्टर त्यांना हिताचे सांगतात त्याकडे दुर्लक्ष करतात तसेच हे पामर लोक
रामावर अविश्वास दाखवतात. त्यांना देहाचा अहंकार असतो ,देहबुद्धी मोठ्या प्रमाणात
असते. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या स्वकर्तृत्वावर मिळवीन असा आत्मविश्वास त्यांना असतो
. त्यामुळे ते पामर लोक अजूनच बंधनात अडकत जातात. कर्ता करविता परमेश्वर आहे यावर पामर
लोकांचा विश्वास नसल्यामुळे ते विषय सुखाच्या
मागे धावत जातात, अशा पामर लोकांना कधी यश मिळते तर कधी अपयश. अपयश आले तर वाट्टेल
त्या मार्गाने ते सुख ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करतात यश मिळाले तर मिळालेले सुख कायम
राहील का याची चिंता मागे लागते आणि अजून पाहिजे अशी हाव त्यातून निर्माण होते ती वेगळीच. विषय सुख मिळवत असताना पापपुण्याचा विचार केलेला
नसल्यामुळे शेवटी दयनीय स्थिती होते. दुसऱ्याला यश आले तर इतरांचा मत्सर करण्यात त्या
पामर लोकांचे चित्त थाऱ्यावर राहत नाही. अपयश आले तर क्रोधावर ताबा न राहिल्यामुळे
त्यांचे मानसिक संतुलन बिघडून ते कोणत्यातरी व्यसनाच्या आहारी जाऊन शेवटी करू नये ते
करतात आणि वागू नये तसे वागतात. आणि म्हणून त्यांना संसारातल्या सर्व गोष्टी (यश ,अपयश,
मान सन्मान , सुख दुःख ) बाधतात आणि समाधान कधीच लाभत नाही -अहो ज्या नरा राम विश्वास नाही | तया पामरा बाधिजे सर्व कांही ||
समर्थांनी
हेच दासबोधामध्ये दशक पाच.समास सात मध्ये बद्धलक्षण समासात विस्तृत पणे लिहिले आहे,
त्यातील काही निवडक ओव्या देत आहे
न कळे भक्ति न कळे ज्ञान | न कळे वैराग्य न कळे ध्यान | न कळे मोक्ष न कळे साधन | या नाव बद्ध ||१२||
हातीं द्रव्याची जपमाळ | कांताध्यान सर्वकाळ | सत्संगाचा दुष्काळ | या नाव बद्ध ||३९||
नाना चिंता नाना उद्वेग | नाना दुःखाचे संसर्ग | करी परमार्थाचा त्याग | या नाव बद्ध ||४५||
घटिका पळ निमिषभरी | दुश्चीत नव्हतां अंतरीं | सर्वकाळ ध्यान करी | द्रव्यदाराप्रपंचाचें ||४६||
नामांत रंगुनीया व्यवहारीं सर्व भोग सेवावे । हाचि निरोप गुरूंचा, भोगासंगे कुठें न गुंतावें ॥२॥
यत्न कसून करिन मी, यश दे, रामा, न दे, तुझी सत्ता । हाचि निरोप गुरूंचा, मानावा राम सर्वदा कर्ता ॥७॥
आपत्तीं मध्ये सुद्धा
आपण स्थिर राहूं शकतो ते राम भक्तीच्याच बळावर. आपण त्याला पाहिजे तर आत्मविश्वास म्हणा.
पण शेवटीं तो विश्वासच आहे, श्रद्धाच आहे. बुद्धिमतेचें तेंच खरे लक्षण आहे. उघड आहे,
रामावर भरोसा ठेवून, माझं बरं वाईट जे काही व्हायचं ते श्रीरामच करेल, मी त्यात संतुष्ट
राहीन, माझा भार आपला भार त्याच्यावरच सोडून द्यावा
।।
जय जय रघुवीर
समर्थ ।।

