भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे ।
भयातीत ते संत आनंत पाहे ॥
जयापाहता द्वैत काही दिसेना ।
भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥
विमानात ब्लॅकबॉक्स असतो आणि accident झाल्यावर शेवटच्या काही तासात नक्की काय झाले या साठी त्याचा उपयोग करतात . आपल्या शरीरात असा एक ब्लॅकबॉक्स म्हणजेच मन. कोणाच्याही मनात कोणत्याही वेळी डोकावून बघीतले तर त्यात एकच दिसेल ते म्हणजे भय. कशाचे भय ? विषयांच्या अतिसेवनाच्या (LIFESTYLE ) मुळे भयंकर रोग होण्याची भीती, संपत्ती असल्यास आयकर खात्याचे भय, कुलवंतांना कुळाची अब्रू जाण्याच भय, सन्मान मिळाला तर तो कसा टिकवावा याचे भय. राजकारणी आणि बलवानाला आपल्यापेक्षा अधिक बलशाली शत्रूचे भय, सौंदर्यवतीला वार्धक्याचे, पंडिताला दुसऱ्या पंडिताशी वादात हरण्याचे, गुणवंताला एखाद्या वेळी पाय घसरण्याची भीती, तर शरीराला मृत्यूचे भय. काय काय सांगू? थोडक्यात सर्वच गोष्टी भयकारक आहेत. केवळ वैराग्य असलेलाच निर्भय असू शकतो असे समर्थ म्हणतात . तस वैराग्य तर आपल्या ठिकाणी नाही. म्हणून आपण कायम भयभीत असतो . भयाचे मुख कारण आहे "दुसरा". कारण भय तर "दुसऱ्या" पासून होते. कोणी "दुसरा" आहे असे समजणे म्हणजे द्वैतबुद्धी हेच भयाचे मूळ कारण. मी हा या देहाएवढाच आहे. देश-काळाने सीमीत आहे ही भावना देहसंबंधी दु:खांना कारण आहे. यालाच
‘आध्यात्मिक ताप’ म्हणतात. मी इतरांपासून वेगळा, सृष्टीपासून वेगळा आहे असे त्याला वाटले. मग स्वत:च्या देहामुळे होणाऱ्या दु:खांमध्ये इतरांपासून होणाऱ्या दु:खांची भर पडली. याला समर्थ ‘आधिभौतिक’ आणि ‘आधिदैविक ताप’ म्हणतात. याचा अर्थ असा होतो निर्भय व्हायचे असेल तर द्वैत असता कामा नये. आपण खरे कोण आहोत, आपले स्वत:चे खरे स्वरुप काय हे तो विसरला. मी आहे म्हणजे
‘अहं’ आहे असे त्याला वाटायला लागले. असे हे विपरीत ज्ञान त्याच्या भीतीचे कारण आहे. ही भीती सर्व चराचरात भरली आहे. या श्लोकात समर्थांनी हेच सांगितले, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. निसर्गाने किंवा भगवंताने निर्माण केलेले आपले शरीर पंचभौतिक आहे, तसंच ब्रह्मांड देखील पंचभौतिक आहे.
एक महाभूत दुसऱ्याला नष्ट करायला टपलेलेच असते. पाणी अग्नीला विझवतं, अग्नी पाण्याला नष्ट करतो, वारा अग्नीला विझवतो; पण तरी ते एका मर्यादेपर्यंत एकत्र नांदतात ते सुद्धा भगवंताच्या कृपेनेच . कारण तू पंचमहाभूत ईश्वराला, भितात. ही पांचभौतिक सृष्टी द्वैतात्मक आहे. म्हणून ती भयाने व्यापली आहे. म्हणजे द्वैत (दुसरा) आहे म्हणून भय निर्माण होते .
पण भगवंताला शरण गेलेले आणि त्याची आज्ञा पाळणारे जे संत पुरुष असतात त्यांना भय वाटत नाही. संतांना आत्मज्ञान झाल्यामुळे त्यांची पक्की खात्री असते सर्वत्र भगवंतच आहे आणि सगळे
व्यवहार तोच चालवतो म्हणून त्यांना कशाचेही भय वाटत नाही. परंतु ते आपल्या सारख्या सामान्य मनुष्याला जमत नाही. कारण आपण आसक्तीनें सृष्टीशी जोडलेलो असतो. सृष्टीच्या मागें असलेल्या मूलतत्त्वाकडे आपण झेप घेऊं शकत नाहीं, त्यामुळें भयातीत होऊं शकत नाहीं.
संतांनी मात्र या दिसणाऱ्या, प्रत्ययास घेणाऱ्या, व्यवहाराला आधार होणाऱ्या, जगतामागचे अनादि आणि अनंत असें तत्त्व साक्षात्कारानें जाणले असतें आणि त्यामुळे ते भयाच्या अतीत होतात, भयाच्या पलीकडे जातात.
जेथें जेथें द्वैत आहे, भिन्नतेची, वेगळेपणाची, भावना आहे, तेथें तेथें भय राहते. संतांच्या लेखी सर्व द्वैत संपलेले असते; सर्व, द्वंद्वे मिटलेली असतात आणि त्यामुळें त्यांना कशाचेंहि भय उरत नाहीं. सर्व भूतजात त्यांना आत्मरूप झालें असल्याने मनामध्ये भय वाटण्याचे काही कारण उरतच नाही, ते सर्वथा निर्भय होतात. तेच समर्थ श्लोकात सांगतात ‘भयातीत ते संत आनंत पाहे.’ केवळ संत मात्र भयातीत असतात. कारण ते अद्वैताच्या आनंदामध्ये असतात. आपणच आणि परमात्मा एकच आहे अशी त्यांची धारणा असते. त्यांना सर्वत्र परमात्मा दिसतो. समर्थ पुढे म्हणतात, ‘जया पाहता द्वैत काही दिसेना । भयो मानसी सर्वथाही असेना ॥‘ सर्व संतांचा अनुभव एकसारखाच आहे.
आपल्या जीवनाची operating manuals न वाचताच आपण जीवनाची गाडी चालवायचा नव्हे अधिकाधिक वेगाने पळवायचा प्रयत्न करतो आणि भयाने ग्रस्त होतो . आपली भीती घालवायची असेल तर एखाद्या संताचा पदर धरावा. श्रद्धेने त्यांचे ग्रंथ वाचावेत. कारण त्यांची काया आणि वाणी गेली असली, तरी ते ग्रंथरूपाने आहेत. ते चैतन्यरूपाने तर आहेतच; पण आपल्याला त्यांच्या ग्रंथातून त्यांच्याशी नाते जोडता येते. फक्त संत सज्जनच भीतीपासून मुक्त आहेत कारण ते मनोमन
अनंताला, परमेश्वराला पाहू शकतात ज्याला पाहिल्याने आपल्यात आणि त्याच्यात काही अंतर
आहे असे वाटतच नाही
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
