
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥
पहिल्या दोन ओळींत नामस्मरण करावे असे सांगितल्यानंतर पुढच्या तिसर्या ओळींत समर्थ सद्वर्तनी असावे, सदाचाराचा त्याग करू नये असे सांगत आहेत. सदाचार हाच थोर आहे. म्हणजे श्रेष्ठ, वंदनीय, आदरणीय स्वीकार्य आहे. तो आचरणांत आणलाच पाहिजे. त्याचा त्याग होता कामा नये. आता हा सदाचार म्हणजे तरी काय ?संतांना आवडेल असे वागणे म्हणजे सदाचार . प्रत्येक कृती करण्या आधी भगवंताला हे वागणे आवडेल का असा विचार करून आपण वागावे . इतका तारतम्य भाव आपल्यात मुळात असतो . समोर भगवंत असेल तर आपण असे बोलू का , असे वागू का , असा विचार करू का असे आपण मनात आणले आणि वागले म्हणजेच सदाचार . सगळ्या मनाच्या श्लोकात सदाचार म्हणजे काय हे वेळो वेळी अत्यंत विस्तृत स्वरूपात सांगितले आहे . त्यातील काही श्लोक इथे उल्लेख केले आहेत
1) धर्माने वागावे असे समर्थ श्लोक क्रमांक ४ मध्ये सांगत आहेत . मना धर्मता नीति सोडू नको हो । मना अंतरी सार वीचार राहो
2) धैर्याने वागावे आणि घाबरून जाऊ नये असावे.असे सातव्या श्लोकात समर्थ म्हणतात, ’मना श्रेष्ठ धारिष्ठ्य जीवीं धरावे’
3) सत्य बोलावे. सत्य बोलणे हा सदाचारातला महत्वाचा गुण. ‘सत्यमेव जयते’
हे वचन माहिती आहेच . तेच समर्थ मना सर्वथा सत्य सांडू नको रे असे पाचव्या श्लोकात लिहितात
4) आर्जव आर्जवी स्वरात आणि गोड शब्दात बोलावे यावर समर्थांनी पुढे – ‘सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकी असे ५३व्या श्लोकात लिहिले आहे
5) सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥ सत्यवादी आणि विवेकाने वागणे म्हणजे सदाचार असे समर्थ पुढे ५३ व्या श्लोकात
6) मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी असे समर्थ ५१ व्या श्लोकात लिहितात कारण द्वेष आणि मत्सर मनात असेल तर मनुष्य कोणत्याही थराला जातो आणि त्याच्या हातून नको ते कोणतेही कृत्य घडू शकते
असे
बरेच उपदेश दासबोधात सुद्धा समर्थानी वेळोवेळी केले आहेत. असे वागल्याने माणसाचे आयुष्य धन्य होते. मनुष्य जन्माचा मूळ उद्देश भगवंताची ओळख आहे आणि तो उद्देश साधला की मनुष्य जन्म धन्य झाला आणि सार्थकी लागला. ऐहिक गोष्टी मिळवून जो मनुष्य खूप यशस्वी झाला त्याचे आयुष्य सार्थकी लागले आणि तो धन्य झाला असा सर्व सामान्य समज आहे तो इथे समर्थांना अभिप्रेत नाही .
|| जय जय रघुवीर समर्थ ||