न ये राम वाणी तया थोर हाणी । जनीं वेर्थ प्राणी तया नाम काणी ॥ हरीनाम हें वेदशास्त्री पुराणी । बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥ नाम घेतांना मनात विचार येतात आणि नामाबद्दल प्रेम येत नाही हे एकवेळ समजू शकतो पण नुसते वैखरीने (तोंडाने पुटपुटणे) नाम घेणे सुद्धा जमत नसेल तर आपले जीवनच व्यर्थ आहे. आपण स्वतःच्या आयुष्याची किती हानी करून घेतो आहे याची कल्पनाही करता येणार नाही. स्वतःला सुधारण्याचे सर्व मार्ग आपण आपल्या हाताने बंद करून टाकल्यासारखे हें आहे. स्वतः च्या पायावर धोंडा पडून घेतल्या प्रमाणे आहे. आदराने रामनाम घेत नसेल तर त्यात रामाचे, परमेश्वराचे काही नुकसान होत नाही तर आपण स्वतः रामनामजपामध्ये मिळणाऱ्या स्वर्गीय आनंदाला मुकतो आहोत. अंतिम मोक्षप्राप्तीला सुद्धा मुकतो म्हणजे मग यात नुकसान कोणाचे होते? म्हणजे आपल्या सारखे करंटे आपणच कारण शेवटी अपार हानी आपलीच होते. रामाची नाही. भले देहांतानंतर मनुष्याचे सगेसोयरे त्याचे कलेवर घेऊन जाताना “रामनाम सत्य है” असा घोष करत चाललेले असले तरी त्याचा उपयोग त्या माणसाला होतो का? अर्थातच नाही कारण तेव्हा ना तो स्वत: हे नाम घेऊ शकतो न...