मना सर्वथा सत्य सांडूं नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥ मना सत्य तें सत्य वाचे वदावें । मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥ १९ ॥ श्लोकाचा पहिला अर्थ : जगात चिरकाल टिकणारे आणि कधीही नाश न होणारे एकच सत्य आहे . ते म्हणजे भगवंत . जगाच्या सुरुवाती पासून जे टिकले आहे ते सत्य म्हणजे भगवंत . म्हणून त्याची कास सोडू नये असे समर्थांनी इथे सांगितले आहे . जे नश्वर आहे त्याला समर्थ मिथ्या म्हणतात . आपल्याला ज्याचा आभास होतो ते मिथ्या उदाहरणार्थ : अंधुक प्रकाशामुळे आपल्याला दोरी सापासारखी दिसू लागते आणि त्यामुळे आपण त्याला काठीने मारतो . मग प्रकाश पडला की समजते की तो साप नव्हता आणि साधी दोरी होती . इथे दोरी वाटणे याला मिथ्या किंवा माया म्हणतात . प्रकाश आल्यामुळे आपल्याला खरे समजते ते सत्य . म्हणजे भगवंत हा सत्य आणि भ्रम दूर होणे म्हणजे आत्मज्ञान होणे . आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो . पण आपली कल्पनाच किती संकुचित असते , याचा कोणी विचार करीत नाही . जो कल्पनेच्या प...